कणकवली : आला रे आला, गोविंदा आलाच्या गजरात कणकवली शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी उंचच उंच मानवी मनोरे रचत दहीहंड्या फोडण्यात आल्या. या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. तर गोविंदा पथकांच्या उत्साहाला जणू उधाणच आले होते.दहीहंडी उत्सवाच्या अनुषंगाने सर्वांचाच आनंद द्विगुणित झाला होता. विशेषत: तरुणाईचा आनंद तर ओसंडून वाहताना दिसत होता. सकाळपासूनच दहीहंडी बांधण्यासाठी अनेक ठिकाणी तरुणाईची लगबग सुरू होती. विविध साहित्य गोळा केले जात होते.
दुपारी १ वाजण्याच्या सुमारास दहीहंडी फोडण्यास सुरुवात झाली. गोविंदा गीतांच्या साथीने दहीहंड्या फोडल्या जात होत्या. जिल्ह्यात अनेक ठिकाणी सायंकाळी ५ वाजेपर्यंत बहुतांश दहीहंड्या फोडण्यात आल्या होत्या. तर काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम सुरू होता.उंचच उंच मानवी मनोरे रचत गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला. गोविंदा पथकांबरोबरच रसिकांनीही गर्दी केली होती. अनेक गोविंदा पथके उंच बांधलेल्या दहीहंड्या फोडण्याचा प्रयत्न करीत होती. तर काही गोविंदा पथकांनी मानवी मनोरे रचत विशिष्ट थरांची सलामी देत रसिकांची वाहवा मिळविली.कणकवली शहरात टेंबवाडी, बांधकरवाडी, कनकनगर, बाजारपेठ आदी ठिकाणी दहीहंड्या बांधण्यात आल्या होत्या. तर ग्रामीण भागातही दहीहंड्या बांधण्यात आल्या होत्या. संघटित शक्तीचे बळ दाखवित तरुणाईने या दहीहंड्या फोडल्या.नागरिकांकडून नाराजीजिल्ह्यात काही ठिकाणी तरुणांकडून दहीहंडीच्या निमित्ताने रस्त्यावरून येणाऱ्या- जाणाऱ्यांकडून पैसे मागितले जात होते. अनेक ठिकाणी दहीहंड्या बांधण्यात आल्याने किती ठिकाणी पैसे द्यायचे अशी विचारणा करीत नागरिकांकडून या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. अशा प्रकारांमुळेच सण तसेच उत्सवातील आनंदाला गालबोट लागत असल्याची प्रतिक्रियाही अनेक नागरिकांतून व्यक्त केली जात होती.