वैभववाडी : गेले तीन दिवस तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी सायंकाळी करुळ घाटात मातीचा ढिगारा रस्त्यावर आला. त्यामुळे तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाल्याने दोन्ही बाजूंना वाहनांची मोठी रांग लागली होती. तर भुईबावडा घाटात शनिवारी रात्री दरड कोसळून सकाळपर्यंत वाहतूक विस्कळीत झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने दोन्ही घाटातील दरडी हटवून वाहतूक सुरळीत केली आहे.तालुक्यात पावसाचा जोर कायम असून नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. शनिवारी रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू होता. सतत पडणाऱ्या पावसामुळे शुक, शांती, अरुणा, देवघर व गडनद्यांना कायम पूर आहे. मुसळधार पावसामुळे शनिवारी रात्री उशिरा भुईबावडा घाटात दरड कोसळली. दरडीमध्ये दगड मातीसह झुडपांचा समावेश होता. त्यामुळे खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतूक रात्रीपासून काहीशी विस्कळीत होती. दरडीच्या ढिगाºयातील झुडपे व दगड बाजूला करून वाहनचालकांनी छोट्या वाहनांना एकेरी वाहतुकीला मार्ग खुला केला. ढिगाºयाजवळून वर्दळ सुरू झाल्यावर मोठ्या वाहनांचीही एकेरी वाहतूक सुरू झाली.दुपारी ३ च्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन जेसीबींच्या सहाय्याने दरड हटवून मार्ग खुला केला. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास करुळ घाटाच्या मध्यावर पावसाच्या पाण्यासोबत दगडमातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर आला. त्यामुळे तळेरे-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. रस्त्यावर आलेली माती आणि पडणारा पाऊस यामुळे दरड कोसळलेल्या ठिकाणी दलदल निर्माण झाली होती.
या मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाल्याने दरडीच्या दुतर्फा वाहनांची मोठी रांग लागली होती. त्यामुळे हवालदार राजू जामसंडेकर, पोलीस नाईक राजेंद्र खेडकर, पाटील, शिंदे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी पी. जी. तावडे यांनी भुईबावडा घाटातील एक जेसीबी तातडीने करुळ घाटात पाठवून दरड हटवित तासभर खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.प्रवाशांनी दिला मदतीचा हातकरुळ घाटात रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्याने दलदल निर्माण झाली होती. त्यामुळे वाहनचालकांसह प्रवासी विवंचनेत दिसत होते. बांधकामचा जेसीबी घाटात येईपर्यंत काही प्रवाशांनी रस्त्याच्या एका बाजूने मातीच्या ढिगाऱ्यातील दगड बाजूला काढण्यास सुरुवात केली होती. जेसीबी पोहोचल्यावर जवळपास २० मिनिटांत करुळ घाटातील वाहतूक सुरळीत झाली.