मालवण : सिंधुदुर्ग किनारपट्टीवर गेले काही दिवस वाऱ्याचा जोर वाढल्याने नौकांनी सुरक्षित बंदरांचा आश्रय घेतला आहे. याचा परिणाम मासेमारीवर झाला असून, मासेमारी ठप्प झाली आहे. मालवणसह सिंधुदुर्गात पर्यटन हंगाम तेजीत असताना माशांची आवक घटल्याने मिळालेल्या मासळीचे दर गगनाला भिडले आहेत.सुरमई, पापलेट, चिंगुळ, आदी बड्या किमतीची व पर्यटकांची मोठी मागणी असलेल्या मासळीला गेल्याकाही महिन्यातील सर्वाधिक दर मिळाला आहे. मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने काही हॉटेल व्यावसायिकांकडून गोवा येथूनही मासळी आयात करण्यात आली आहे. हवामानातील हा बदल दोन ते तीन दिवस असाच राहील, असा अंदाज गेले आठ दिवस समुद्रात उत्तरेच्या दिशेने जाणाऱ्या (उपरच्या) वाऱ्याने जोर धरला आहे. समुद्री पाण्याचा प्रवाह दक्षिण दिशेने जोरदार वाहत आहे. याला मासेमारी भाषेत पाण्याला ‘करंट’ मारणे असे म्हणतात. या हवामानातील बदलामुळे सुरक्षेच्या कारणास्तव काही नौका मालवण, सर्जेकोट, देवगड व अन्य बंदरात स्थिरावल्या आहेत. वाऱ्याचा परिणाम मासेमारीवरही झाला आहे. समुद्रात मासळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. (प्रतिनिधी)
समुद्रात ‘करंट’; मासेमारी ठप्प
By admin | Published: December 25, 2015 10:56 PM