अनंत जाधव, सावंतवाडी: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व केद्रींय मंत्री नारायण राणे यांच्यातील विळ्याभोपळ्याचे सख्य संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवले होते. मात्र हेच दोन नेते लोकसभा निवडणुकीच्या निमित्त एकत्र आले असून तब्बल पंधरा वर्षानंतर मंत्री राणे हे केसरकर यांच्या निवासस्थानी दाखल झाले. आमच्यात कोणताही वैयक्तिक वाद नव्हता, वैचारिक मतभेद होते, असे म्हणत केसरकर राणे वादावर पडदा पडला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार प्रचार सभा तसेच गाठीभेटी घेत आहे.रविवारी सावंतवाडी तालुक्यात मंत्री राणे दाखल झाल्यानंतर प्रथम ते मंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी गेले. यावेळी केसरकर यांनी कार्यकर्त्यांसह त्याचे स्वागत केले.
राणे २००९ मध्ये काँग्रेस मध्ये असतना तत्कालीन खासदार निलेश राणे यांच्या प्रचार दौऱ्यावेळी केसरकर यांच्या श्रीधर निवासस्थानी भेट घेतली होती. त्यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी असल्याने दोघांनी प्रचार यंत्रणा राबविली होती.आणि त्या निवडणुकीत निलेश राणे निवडून ही आले होते. पण नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत केसरकर हे निवडून आल्यानंतर निधी वाटपा वरून केसरकर राणे याच्यात वाद झाला होता.हा वाद पुढे विकोपाला गेला आव्हान प्रतीआव्हान ही देण्यात आले अशातच दोघांतील संबध ताणले होते.
त्यातच २०१४ मध्ये निलेश राणे यांचा प्रचार करावा लागतो म्हणून केसरकर हे थेट शिवसेनेत गेले होते. तर २०१९ मध्ये राणे यांनी भाजप मध्ये प्रवेश केला होता.तरीही दोघांतील विळ्याभोपळ्याचे सख्य काहि केल्या संपले नव्हते. मात्र मध्यंतरी महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय घडामोडी नंतर राणे व केसरकर एकत्र आले होते.त्याच्यातील मनोमिलना नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारण बदलणार हे निश्चित होते.त्यातच २०२४ च्या लोकसभा निवडणुकी साठी भाजप कडून नारायण राणे यांचे नाव आघाडीवर आहे.त्यामुळे राणे हे मतदारसंघात प्रचार यंत्रणा राबवत आहेत. अनेकाच्या गाठीभेटी घेत आहेत.याच पाश्र्वभूमीवर राणे हे सावंतवाडीत आले होते.यावेळी त्यांनी सर्वात प्रथम केसरकर यांच्या श्रीधर निवासस्थानी भेट दिली या भेटीवेळी केसरकर यांनी राणे यांचे कार्यकर्त्यांसह स्वागत केले तसेच त्यांचे आदरातिथ्य ही केले.
२००९ नंतर प्रथमच राणे हे केसरकर यांच्या निवासस्थानी आल्याने सगळ्याच्या भुवया उंचावल्या होत्या सिंधुदुर्ग च्या राजकारणात चर्चेचा विषय बनला असून राणे यांनी तब्बल पंधरा वर्षानंतर केसरकर यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे.
आम्ही अधूनमधून भेटत होतो: राणे
आमच्यात कोणताही वैयक्तिक वाद नव्हता. वैचारिक मतभेद असू शकतात, पण मी एखाद्या कामाबद्दल केसरकर यांना फोन केला, तर त्यांनी कधीही माझे काम नाकारले नव्हते आणि विकासालाही विरोध केला नव्हता, असे म्हणत केसरकर यांचे मंत्री राणे यांनी कौतुक केले.