मालवण : दागिने पॉलिशच्या बहाण्याने मसुरे देऊळवाडा वेताळटेंब येथील जयश्री रमेश राणे या वृद्ध दांपत्यास फसविणाऱ्या चोरट्याला स्थानिक ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याचा दुसरा साथीदार सोन्याची बांगडी घेऊन जंगलात पळून गेला.
पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. पकडलेल्या संशयित दिवेंद्रकुमार (रा. बिहार) याला येथील पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत पुढील कार्यवाही सुरू होती.मसुरे वेताळटेंब येथील राणे दांपत्याच्या घरी मंगळवारी दुपारी दोन चोरटे गेले. त्यांनी सुरुवातीस त्यांना घरातील भांडी स्वच्छ करून दाखविली. त्यांचा विश्वास संपादन करत हातातील बांगड्या, सोन्याची साखळी पॉलिश करण्यास मागितली. त्यानंतर चार बांगड्या, एक सोन्याची साखळी पॉलिश करून ती हळदीच्या पाण्यात ठेवण्यास दिली. एका तासानंतर पाण्यातून दागिने काढा असे त्यांनी त्या दांपत्यास सांगितले आणि ते तेथून निघून गेले.काही वेळात तेथे आलेल्या विलास मुळये यांनी बांगड्या बाहेर काढण्यास सांगितले असता तीनच बांगड्या आढळल्या. याशिवाय त्यांचे वजनही कमी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे मुळये यांनी चोरट्यांचा शोध घेत एका चोरट्यास पकडले तर त्याचा दुसरा साथीदार सोन्याची बांगडी घेऊन जंगलात पसार झाला.
सचिन परब, मोहन आंबडोसकर, दीपक बागवे, प्रणय परब, बापूजी परब या ग्रामस्थांनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र एक चोरटा पळून जाण्यात यशस्वी ठरला. मात्र पकडलेल्या एकास ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.मसुरे दूरक्षेत्राचे प्रमोद नाईक, विवेक फरांदे, हरी जायभाय, पोलीस पाटील नेवेश फर्नांडिस यांनी घटनास्थळी धाव घेत चोरट्यास ताब्यात घेत मालवण पोलीस ठाण्यात आले. त्याच्याकडून साहित्य जप्त केले असून पोलिसांकडून पुढील कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.अधिक तपास पोलीस निरीक्षक विनीत चौधरी करत आहेत. ग्रामस्थांनी चाणाक्षपणे चोरटा पकडून देण्यात मदत केल्यामुळे पोलिसांनी त्यांचे आभार मानले आहेत.