रजनीकांत कदम, कुडाळ : अत्यंत घाईघाईने राबविल्याने योग्य प्रकारे नियोजन व प्रसिद्धी नसलेल्या कुडाळ येथील ‘सिंधु सरस २०१५’ या बचतगटांच्या प्रदर्शनाकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसते आहे. संपूर्ण जिल्ह्यातून येथे दाखल झालेल्या स्वयंसहाय्यता बचतगटांच्या वस्तूंची विक्री झालेली नसल्याने खर्च अधिक आणि नफा कमी अशी स्थिती बचतगटांची झाली आहे. बचतगटातील महिलांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे हे प्रदर्शन भरविण्यामागचा शासनाचा हेतू सफल झाला आहे का, असा प्रश्न येथील प्रदर्शन पाहिल्यावर पडत आहे. शासनातर्फे राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये स्वयंसहाय्यता बचतगट स्वरोजगारी यांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्यात येते. तसेच त्यांना व्यवसायासाठी व्याज अनुदान व कर्जही उपलब्ध करून देण्यात येते. सद्यस्थितीत या स्वयंरोजगारींनी तयार केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळणे आवश्यक असल्याने, महालक्ष्मी सरसच्या धर्तीवर स्वयंसहाय्यता बचतगटांच्या उत्पादित मालाचे प्रदर्शन व विक्रीकरिता विभागीय व जिल्हास्तरावर दरवर्षी प्रदर्शने आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. याच निर्णयानुसार सिंधुदुर्गातही सिंधु सरस या नावाने जिल्ह्यातील बचतगटांच्या मालाचे प्रदर्शन व विक्रीसाठी प्रदर्शन दरवर्षी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभाग आयोजित करतो. याहीवर्षी कुडाळ नवीन एसटी डेपो येथील मैदानावर ‘सिंधुसरस २०१५’च्या प्रदर्शनाचे आयोजन शासनाने केले. या प्रदर्शनाचे उद्घाटन १२ फेब्रुवारी रोजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. हे प्रदर्शन १६ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. यंदा मात्र हे प्रदर्शन भरविण्यापूर्वी अगोदर आठ ते १५ दिवस कोणत्याही प्रकारे या प्रदर्शनाची प्रसिद्धी करण्यात आली नाही. अत्यंत घाईघाईने सुरू केलेल्या या प्रदर्शनामध्ये जिल्ह्यातील १५६ बचतगटांचे सुमारे ९५ स्टॉल आहेत. मात्र, नियोजन व प्रसिद्धीअभावी या प्रदर्शनाचा मुख्य हेतू सफल होत नाही, हे प्रदर्शन पाहिल्यावर लक्षात येते. ‘नाकापेक्षा मोती जड’ अशी स्थिती येथे सहभागी झालेले बचतगट हे जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून आलेले असून, पाच दिवस इथेच वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्यांना जेवण, नाश्ता, चहा व इतर आवश्यक गोष्टी स्वत:च्याच पैशांनी घ्याव्या लागत आहेत. इथे वस्तूंची विक्री नाही आणि दिवसाला खर्च मात्र जास्त होत आहे. त्यामुळे ‘नाकापेक्षा मोती जड’ अशी स्थिती स्टॉलधारकांची झाली आहे. या प्रदर्शनात काही बचतगटांच्या महिलांनी या प्रदर्शनाच्या सद्यस्थितीबाबत आपले मत व्यक्त केले. याठिकाणी अगोदरच ग्राहक कमी असल्यामुळे ग्राहकांनी कमी दराने वस्तू मागितली तर द्यावी लागते. त्यामुळे वस्तूंना बाजारभाव मिळत नाही. जेवण, प्रवासभत्ता मिळणार म्हणून सांगताहेत, परंतु अद्याप काहीही मिळालेले नाही. ‘कोण माणसाच येनत नाय’ साधो येकादो अधिकारी पण वस्तू खरेदी करूक बघना नाय. बाहेरच्या जिल्ह्यातील पर्यटक सोडाच, जिल्ह्यातील लोक पण कमी येतात. संध्याकाळी कार्यक्रम असल्यावरच फक्त थोडीफार गर्दी होते. बाकी दिवसभर कोणीच नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. इथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था योग्य प्रकारे नाही. मात्र, अधिकाऱ्यांना बिसलरीच्या दोन दोन बाटल्या देण्यात येतात. काहींनी तर म्हटले की, इथे येऊन फसायला झाले. आम्ही आता स्टॉल बंद करून जाणार आहोत, अशी मते स्टॉलधारकांनी व्यक्त केली. बचतगटांच्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करून त्यांच्या वस्तूंना बाजारपेठ देऊन बचतगटांना आर्थिक सक्षम कारणे हा हेतू आहे. मात्र, अशाप्रकारे घाईघाईत व नियोजनाचा अभाव असलेले प्रदर्शन राबवून प्रशासनाचा हेतू साध्य झाला काय? या प्रश्नाचे उत्तर शोधणे गरजेचे आहे.
‘सिंधुसरस’ प्रदर्शनाकडे ग्राहकांची पाठ
By admin | Published: February 15, 2015 12:37 AM