सिंधुदुर्गनगरी : माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे संवादाची अनेक माध्यमे उपलब्ध झाली. संवादाचा वेग वाढला. फेसबुक, वॉट्सअॅप, व्टीटर, ब्लॉग, अशी अनेक माध्यमे जनमाणसांत चांगलीच रुजली आहेत. तथापि, यांचा गैरवापरही होऊ लागला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून तसेच राज्याचे सायबर व महिला अत्याचार प्रतिबंध विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात ३२ ठिकाणी एकाचवेळी प्रत्येक जिल्हा मुख्यालयात ‘सायबर सेल’ स्थापन होत आहे. यामुळे सायबर गुन्ह्यांवर अंकुश बसेल. जनतेने या सेलकडे आपल्या तक्रारी दाखल कराव्यात, याचबरोबर पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या सायबर सेलचा प्रभावीपणे वापर करून सायबर क्राईम अंतर्गत घडणाऱ्या गुन्ह्यांचा छडा लावावा, असे आवाहन गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात नव्याने सरू करण्यात आलेल्या सायबर सेलचे उद्घाटन पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, अप्पर जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविकात जिल्हा पोलिसप्रमुख अमोघ गावकर यांनी सायबर सेलच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत गिते यांनी केले. समारंभास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, महावितरणचे अधीक्षक अभियंता निर्मले, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तसेच पोलिस विभागातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. गृहनिर्माण प्रकल्प राबविणारजनतेच्या रक्षणाबरोबरच तक्रार द्यायला पोलिस ठाण्यात आलेल्या तक्रारदाराला सौजन्यपूर्ण वागणूक देणे ही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे, असे स्पष्ट करून पालकमंत्री केसरकर म्हणाले की, पोलिस दलात काम करणारे हात आणि त्यांचे मन मजबूत राहिले पाहिजे. या दृष्टिकोनातून पोलिसांचे मनोधैर्य उंचावण्याचाही विभागाकडून सातत्याने प्रयत्न केला जातो. कर्तव्य भावनेने अविश्रांत कार्यरत असणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासाची चांगली सुविधा मिळावी, यासाठी गृह विभागामार्फत पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी वसाहतीचे नूतनीकरण, कायमस्वरूपी वास्तव्यासाठी गृहनिर्माण प्रकल्प, आदी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सायबर गुन्ह्यांवर अंकुश बसेल
By admin | Published: August 16, 2016 9:52 PM