खेड : खेड तालुक्यातील दाभोळ ऊर्जा प्रकल्पातील बाधीत प्रकल्पग्रस्तांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत त्यांना मिळालेल्या धनादेशाची केवळ २५ टक्के रक्कम देऊन त्यांची बोळवण करण्यात आली आहे. याप्रकरणी खेड पोलीस स्थानकात फिर्याद दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर खेड येथील न्यायालयातील निकालानंतर उच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सध्या सुनावणी सुरू आहे. हे प्रकरण सध्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे असून, यातील दोषींना मोकाट सोडू नये, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़ अनेक शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन काही ठकसेनानी त्यांना फसवले आहे. दोन वर्षांपूर्वी दाभोळ ऊर्जाप्रकरणी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी दोषी आरोपींबाबत ही कारवाई अपेक्षित आहे़ खेड पोलीस स्थानकात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ त्याच्यासह आणखी काहींचा यामध्ये सामावेश आहे़ या आरोपींची सखोल चौकशी करून त्यांना कडक शासन करण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे. खाडीपट्ट्यातील काही शेतकऱ्यांच्या जमिनी येथील दाभोळ ऊर्जा प्रकल्पासाठी संपादीत करण्यात आल्या आहेत़ अनेक शेतकऱ्यांची फळझाडे आणि बांधबंदिस्तांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्याने त्यांनाही नुकसानभरपाई देण्यात आली आहे. मात्र, भरपाईचे धनादेश थेट शेतकऱ्यांच्या हाती पडले नाहीत, तर ते एजंट म्हणून वावरत असलेल्या दोघांच्या हाती पडल्याने या शेतकऱ्यांना अक्षरश: लुबाडण्यात आले. पूर्णपणे निरक्षर असलेल्या या शेतकऱ्यांचे धनादेश याचा दोघांनी परस्पर वटविले आहेत. धनादेशाच्या केवळ २५ टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या हातात पडल्याचे या शेतकऱ्यांनी बोलून दाखवले. उर्वरित ७५ टक्के रक्कम या दोघा एजंटांनी घेतल्याची माहिती येथील शेतकरी सांगत आहेत.विशेष म्हणजे या दोघांकडील चार चाकी गाड्या आणि त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी आता होत आहे, एवढा पैसा या दोघांनी आणला कोठून, याविषयी पोलीसही अनभिज्ञ होते. मात्र, या दोघांविरोधात पोलीस ब्रदेखील काढायला तयार नव्हते, तर काही दिवसांनी हे प्रकरण रत्नागिरीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आल्यांनतर या प्रकरणाला खऱ्या अर्थाने वाचा फुटली़ हे प्रकरण सध्या उच्च न्यायालयात असून, त्याची सुनावणी सुरू असल्याचे समजते. आता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने याप्रकरणी कंबर कसून आरोपींना कडक शिक्षा होण्यास परिश्रम घ्यावेत, अशी मागणी हे शेतकरी करीत आहेत. (प्रतिनिधी)पोलीस स्थानकात एकावर गुन्हा दाखल.धनादेश थेट शेतकऱ्यांच्या हाती नाहीत.कडक कारवाईची मागणी.
दाभोळ प्रकल्पातील बाधितांची फसवणूक
By admin | Published: January 15, 2016 11:21 PM