वेंगुर्ले : दाभोली दाजी आश्रम येथील धोकादायक वळणावर अज्ञात गाडीतून तेल गळती होऊन सात मोटारसायकली घसरून दहा जण किरकोळ जखमी झाले. मात्र, वेेंगुर्ले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. दाभोली दाजी आश्रम या धोकादायक वळणावर सकाळच्या सुमारास अज्ञात गाडीतून सुमारे १५ ते २० मीटर अंतरापर्यंत तेल गळती झाली. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना वळणावर पडलेल्या तेलाचा अंदाज न आल्याने सात मोटारसायकली रस्त्यावर घसरल्या. यामुळे दहा जणांना किरकोळ दुखापती झाल्या. येथील जागृत ग्रामस्थांनी तात्पूरती सुरक्षा म्हणून वाहकांना समजण्यासाठी लाल झेंडा व दगड ठेवून धोक्याची सूचना दिली व बांधकाम विभागास याबाबत माहिती दिली असता बांधकाम विभागाचे अधिकारी एस. एस. पाटील यांनी या घटनेची तत्काळ दखल घेत रस्त्यावर पडलेल्या तेलावर कर्मचाऱ्यांकडून माती टाकून रस्ता साफ करून घेतला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. बांधकाम विभागाने तत्काळ केलेल्या या कार्यवाहीबाबत ग्रामस्थ व प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
दाभोलीत तेल गळती होऊन अपघात
By admin | Published: February 02, 2016 9:31 PM