बांदा : मायनिंगमुळे संपूर्ण गाव विस्थापित होणार आहे. त्यामुळे गावचा विनाश करणाऱ्या या प्रस्तावित खनिज प्रकल्पाला गावात कोणत्याही परिस्थितीत येऊ देणार नाही. प्रसंगी प्राण देऊ पण कोणत्याही आमिषाला बळी न पडता एक इंचदेखील जमीन विकणार नाही, असा एकमुखी ठराव करत डेगवेवासियांनी विशेष ग्रामसभेत मायनिंगविरोधात एल्गार केला. ग्रामसभेला उपस्थित १५0 ग्रामस्थांनी एकजूूट दाखवत प्रस्तावित खनिज प्रकल्पाला १00 टक्के विरोधाची भूमिका यावेळी कायम ठेवली. यावेळी ग्रामदैवता श्री देवी माऊलीला सार्वजनिक गाऱ्हाणे घालून ग्रामस्थांनी कोणत्याही परिस्थितीत मायनिंगला समर्थन न देण्याची शपथ घेतली. डेगवे गावात होऊ घातलेल्या प्रस्ताविक खनिज प्रकल्पाबाबत ग्रामस्थांची मते जाणून घेण्यासाठी येथील माउली मंदिरात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. खनिज प्रकल्पाविरोधात लढा देण्यासाठी ग्रामसभेत मायनिंगविरोधी संघर्ष समितीची एकमताने निवड करण्यात आली. या समितीच्या मार्गदर्शनाखाली लढा उभारण्याचे ठरवण्यात आले. समितीच्या अध्यक्षपदी उपसरपंच मधुकर देसाई यांची निवड करण्यात आली. यावेळी सरपंच स्वप्नाली आंबेरकर, सोसायटी अध्यक्ष प्रवीण देसाई, भारती देसाई, सुनील देसाई, बाबा देसाई, बाबाजी देसाई, तलाठी किरण गझीनकर, ग्रामसेविका लीना प्रभू, पोलीसपाटील प्रमोद देसाई आदी उपस्थित होते. डेगवे गावात खनिज प्रकल्प मंजूर झाल्याने या प्रकल्पाबाबत ग्रामस्थांनी आपली मते मांडावी, असे शासनातर्फे सुचविण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत मायनिंगविरोधी भूमिका मांडली. जयवंत देसाई व उत्तम देसाई यांनी सर्वप्रथम ग्रामपंचायतीने प्रस्तावित खनिज प्रकल्पाबाबत परीपूर्ण माहिती मिळवावी व ती ग्रामस्थांसमोर मांडावी, असे सुचविले. त्यावर उपसरपंच मधुुकर देसाई यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनाकडे अद्यापपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. खनिकर्म विभागाच्या संकेतस्थळावर डेगवे गावातील खनिज प्रकल्पाबाबत पूर्ण अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे. त्याची माहिती मिळवण्यात आली असून, त्यासाठीच आजची ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत ग्रामस्थांनी त्यांची मते आक्रमकपणे मांडली. सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन याचा सामना करायला हवा, असे यावेळी अनेक ग्रामस्थांनी मत मांडले. त्याचबरोबर भविष्यात एकत्रितपणे हा लढा लढण्याचेही ठरवण्यात आले. (प्रतिनिधी)
डेगवेवासियांचा मायनिंगविरोधी एल्गार
By admin | Published: December 09, 2015 1:10 AM