रहिम दलाल -- रत्नागिरी -संगमेश्वर व लांजा या तालुक्यातील शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायातून आर्थिक उन्नती साधता यावी, यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग प्रयत्नशील आहे. त्याद्वारे या दोन तालुक्यांमधून सुमारे २५ हजार दुधाचे संकलन करण्यात येणार असून, सुमारे दीड हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन गायी देण्यात येणार आहेत.जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाला मोठ्या प्रमाणात संधी असतानाही दुधाचे उत्पादन फार कमी प्रमाणात आहे. शासकीय डेअरीकडून सुमारे ६५०० ते ७०० लीटर्स दुधाचे संकलन करण्यात येते. त्यामुळे कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यातून विविध कंपन्यांच्या दुधाची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. या दुग्ध व्यवसायातून अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या सबल होऊ शकतात. त्यासाठी जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय वाढविण्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग प्रयत्नशील आहे. संगमेश्वर तालुक्यात २१ आणि लांजा तालुक्यामध्ये ९ अशा एकूण ३० दुग्ध संस्था आहेत. या दोन्ही संस्थांचे सुमारे १५०० लाभार्थी सभासद आहेत. मात्र, या दुग्ध संस्थांकडून किरकोळ प्रमाणात दूध संकलन केले जात असून, ते या सभासद असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यास कमी पडत आहेत. या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घेतला आहे.संगमेश्वर तालुक्यातील १०५० आणि लांजातील ४५० सभासद लाभार्थींना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नाबार्डकडून प्रत्येकी २ गायी देण्यात येणार आहेत. या एका गायीची किंमत सुमारे ४० हजार रुपये असून, सर्वसाधारण लाभार्थीला २५ टक्के अनुदान, तर अनुसूचित जाती/जमातीच्या लाभार्थीला ३३ टक्के अनुदान देण्यात येणार आहे. नाविन्यपूर्ण योजनेतून व्याज देण्यात येणार आहे. तसेच दुग्ध वाढीसाठी प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला ठोंब्यांचेही वाटप होणार आहे. या गायींचे वाटप येत्या २६ जानेवारी, २०१६ पर्यंत करण्यात येणार आहे. जिल्ह्यात वाटप करण्यात येणाऱ्या गायींमुळे दुधाचे उत्पादन वाढणार आहे. सुमारे २५ हजार लीटर्स दुधाचे संकलन करण्यात येणार आहे. त्यामुळे येथील जनतेला जिल्ह्यातूनच दूध मिळणार आहे. या दुधाची विक्री मोठ्या शहरांमध्ये करण्यात येणार आहे. त्यासाठी ब्रँडही तयार करण्यात येणार आहे. या व्यवसायावर देखरेख करण्यासाठी जिल्हा स्तरावर सल्लागार समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुभाष म्हस्के यांनी सांगितले.विशेष लक्ष : गायींच्या आरोग्याची काळजी घेणारशेतकऱ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या गायींच्या आरोग्याची पशुसंवर्धन विभागाकडून काळजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी ७ दुग्ध संस्थांमागे एक पशुवैद्यकीय अधिकारी देण्यात येणार आहे. हे पशुवैद्यकीय अधिकारी या गायींच्या आरोग्यावर विशेष लक्ष ठेवणार आहेत. दूधसंकलन वाढणारजिल्ह्यात सुमारे ६५०० ते ७००० लीटर दुधाचे संकलन करण्यात येत असल्याने अन्य जिल्ह्यातील दूध कंपन्या रत्नागिरी जिल्ह्याला दुधाचा पुरवठा करतात. मात्र, येत्या तीन महिन्यामध्ये संगमेश्वर व लांजा या दोन तालुक्यातून सुमारे २५ हजार दुध संकलन करण्यात येणार आहे.
दुग्ध व्यावसायिक होणार सधन
By admin | Published: December 03, 2015 11:03 PM