वैभववाडी : विविध मंडळे, संस्था व राजकीय पक्षांकडून दहीहंडीच्या उत्सवाचा ईव्हेंट बनविला गेला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अतुल रावराणे यांनी सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भैरीभवानी फांऊडेशनतर्फे वैभववाडी येथे दरवर्षी उभारली जाणारी दहीहंडी यावर्षी रद्द करून हंडीच्या पारितोषिकाची १ लाख ५१ हजार रुपये रक्कम राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून दिली आहे. या आर्थिक मदतीचा धनादेश अतुल रावराणे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीकरिता सिंधुदुर्गचे निवासी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवळ यांच्याकडे सुपूर्द केला.गोपाळकाल्याच्या उत्सवाचे रूपांतर गेल्या काही वर्षांत ईव्हेंटमध्ये झाले असून, हा ईव्हेंट कॅच करण्यासाठी आॅर्केस्ट्रा, सेलिब्रिटींना आणून पब्लिकला आकर्षित करण्यावर भर वाढला आहे. महानगरांपासून छोट्या शहरांपर्यंत हे चित्र सर्रास पहायला मिळत आहे. मात्र, राज्यात दुष्काळ पडला असल्याने भैरीभवानी फाऊंडेशनने यावर्षी दहीहंडी उत्सवाला फाटा देऊन सामाजिक बांधीलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. दहीहंडीच्या पारितोषिकाचे १ लाख ५१ हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीकरिता प्रशासनाकडे सुपूर्द करून दुष्काळग्रस्तांसाठी खारीचा वाटा उचलला आहे.युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा भैरीभवानी फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल रावराणे यांनी निवासी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवळ यांच्याकडे १ लाख ५१ हजार रुपये रकमेचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक, देवगडचे सुधीर आंबेकर, कुडाळचे सुनील राऊळ, अवी सापळे, वैभववाडी तालुकाध्यक्ष महेंद्र रावराणे, संतोष बोडके, धीरज पांचाळ, मंदार सावंत, धुळाजी काळे, लवू पवार, आदी उपस्थित होते.मदतीचा धनादेश दिल्यानंतर अतुल रावराणे म्हणाले, महाराष्ट्र दुष्काळात होरपळत आहे, अशा परिस्थितीत आपण दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात पुढे करून माणुसकीचा धर्म जपला पाहिजे. याकरिता यावर्षीची दहीहंडी रद्द केली. या हंडीची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीकरिता दिली आहे. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जगण्याची ताकद मिळावी, या हेतूने आम्ही हा निर्णय घेतला. राज्यातील मंडळे, संस्था व राजकीय पक्षांनी दहीहंडी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करून सांस्कृतिक कार्यक्रमांवरील खर्च दुष्काळग्रस्तांना दिला असता तरी मोठा निधी उभा राहू शकला असता. (प्रतिनिधी)
दहीहंडीचे दीड लाख दिले दुष्काळग्रस्तांना
By admin | Published: September 06, 2015 8:56 PM