सावंतवाडी : सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारे पाळणेंकोड धरण पूर्ण भरले असून, या धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. गेल्यावर्षी १२ जुलैला हे धरण भरले होते. पण यावर्षी अगोदर दोन दिवस धरण भरल्याने समाधान व्यक्त होत आहे. मंगळवारी सकाळी धरण पूर्ण क्षमतेने भरले व पाणी बाहेर पडते होते. हे समजल्यावर नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह सहका-यांनी धरणाला भेट दिली. तसेच विधिवत जलपूजन करण्यात आले.सावंतवाडी शहराला पाळणेकोंड धरणातून पाणीपुरवठा होत असतो. सावंतवाडीला आतापर्यंत कधीच पाणीटंचाई भासली नाही. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की अवघ्या एक ते दीड महिन्यातच धरण भरले जाते. गेल्या वर्षी १२ जुलैला पाळणेकोंड धरण भरले होते. मात्र यावर्षी सर्वच भागात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अगोदरच दोन दिवस पाळणेकोंड धरण भरले असून, पाणी पूर्ण क्षमतेने पडत आहे. त्यामुळेच धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. तसेच धरणाचे पाणी पडल्यानंतर नगरपालिका विधिवत जलपूजन करते. त्याप्रमाणे आजही जलपूजन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही धरणातून पाणी पडत आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे आतापर्यंत कधीही सावंतवाडीला पाणी टंचाई भासली नाही. तशी यावर्षीही पाणी टंचाई भासणार नाही. गोडबोले गेटचे काम पूर्ण झाल्यानंतर धरणाची थोडी उंची वाढली असल्याचे साळगावकर यांनी नमूद केले. तसेच लवकरच सावंतवाडीवासीयांना आणखी एक पाण्याची योजना आणणार असल्याचे ते म्हणाले.यावेळी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, प्रभारी मुख्याधिकारी संतोष जिरगे, सभापती आनंद नेवगी, सुरेंद्र बांदेकर, पालिका अभियंता तानाजी पालव, पाणीपुरवठा अभियंता भाऊ भिसे आदी उपस्थित होते.
सावंतवाडीला पाणीपुरवठा करणारे धरण ओव्हर फ्लो
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 8:02 PM