मालवण : समुद्रात घुसखोरी करणाऱ्या नौकेवर कारवाईसाठी मत्स्य व्यवसाय, पोलीस व स्थानिक मच्छिमारांना गस्तीनौकेद्वारे नेण्याचा निर्णय झालेला आहे. मत्स्य व्यवसाय विभागात नव्याने रूजू झालेल्या परवाना अधिकाऱ्यांने स्थानिक मच्छिमारांना सोबत घेऊन न जाण्याचे वरिष्ठांचे आदेश असल्याचे सांगितले. परिणामी शनिवारी मच्छिमारांविना गस्तीस गेलेली नौका दोन तासांत माघारी परतल्यानंतर परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सनी स्थानिक मच्छिमारांची जाळी तोडून नुकसान केले आहे. त्यामुळे मच्छिमारांतून संताप व्यक्त होत आहे.यासंदर्भात पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांना गस्तीसाठी बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मच्छिमारांना सोबत नेणे आवश्यक आहे. याची माहिती नव्या परवाना अधिकाऱ्यांना द्यावी, अशा आशयाचे पत्र पाठविले आहे.पोलिसांच्या ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांना पत्र पाठविले आहे.
यात अनधिकृत मासेमारीविरोधात कारवाईसाठी जे नव्याने मत्स्य परवाना अधिकारी नियुक्त झाले आहेत त्यांना मालवण बंदराची व परिस्थितीची माहिती देणे आवश्यक आहे. बैठकीत ठरल्यानुसार गस्तीनौकेवरून कारवाईसाठी जाताना मत्स्य व्यवसायचे अधिकारी, पोलीस तसेच स्थानिक मच्छिमारांना नेणे आवश्यक आहे. जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार टाळता येईल.त्यामुळे नव्याने आलेल्या मत्स्य परवाना अधिकाऱ्यांना याची माहिती द्यावी तसेच गस्तीनौकेवरील सर्वांच्या सुरक्षिततेसाठी लाईफ जॅकेट तसेच संरक्षित यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात यावी, अशी सूचना केली आहे. मत्स्य व्यवसाय विभागाने गस्त सुरू न ठेवल्यानेच मच्छिमारांच्या जाळ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप मच्छिमारांनी केला आहे.