वेंगुर्ला : पर्यटनाच्या उद्देशाने पर्यटन विकास महामंडळाने उभादांडा सागरेश्वर किनारी उभारलेले वुड हाऊस, स्वच्छतागृह, चेंजिंग रुम, पदपथ, गॅझिबो यांचे समुद्राच्या लाटांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यातील स्वच्छतागृह आणि चेंजिंग रुम पूर्णपणे कलंडले असून चुकीच्या पद्धतीने उभारणी केल्यामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे तांत्रिक सहाय्यक अधिकारी पृथ्वीराज जाधव यांना सागरेश्वर येथे भेट घेऊन घेराव घालण्यात आला.यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्यासह मच्छिमार नेते दादा केळुसकर, बाबा नाईक, उभादांडा उपसरपंच गणपत केळुसकर, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, युवामोर्चाचे संदीप पाटील, समीर चिंदरकर, नितीश कुडतरकर, दादा तांडेल, कमलाकांत प्रभू, विद्याधर धानजी, जगन्नाथ राणे, शेखर काणेकर, दशरथ गडेकर, पुंडलिक हळदणकर, निलय नाईक, राहुल मोर्डेकर, प्रकाश मोटे, प्रथमेश यंदे, सोनू सावंत आदी उपस्थित होते.या संपूर्ण प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी पर्यटन महामंडळाच्या ओरोस येथील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात येणार आहे, असे प्रसन्ना देसाई यांनी सांगितले.सध्या एमटीडीसीने समुद्रकिनारी जेथे वुड हाऊस उभारले आहेत त्या जागी पूर्वी सुरुची झाडे होती. ती झाडे समुद्री उधाणाने उन्मळून पडून ती जागा सपाट झालेली होती. त्यामुळे शेजारीच असलेल्या ग्रामस्थांना समुद्राच्या उधाणाचा त्रास होत होता. ग्रामस्थांची सातत्याने धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्याची मागणी होती. परंतु त्यांच्या मागणीस केराची टोपली दाखवून पर्यटन विकास महामंडळाने हा पर्यटन प्रकल्प उभा केला होता.यापूर्वीही पर्यटन महामंडळाने तंबूनिवास प्रकल्प सागरेश्वरच्या सुरुच्या बनात उभारला होता. त्यावेळीसुद्धा हा प्रकल्प खासगी जमिनीत उभारल्यामुळे जागा मालकाने त्याच्यावर ताबा सांगून ते तंबू आपल्या ताब्यात घेतल्यामुळे तो प्रकल्प बंद झाला. त्यावेळीही दोन कोटीेंचा प्रकल्प अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे गुंडाळावा लागला. त्यामुळे शासकीय निधीची लूटमार होत असल्याचा आरोप करण्यात आला.विरोधी पक्षनेत्यांमार्फत अधिवेशनात आवाज उठविणारठेकेदार व अधिकारी यांच्यात साटेलोट असल्याने शासनाच्या कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. या जागेचे तांत्रिक सर्वेक्षण करणारी कंपनी स्ट्रकवेल इंजिनिअरिंग, मुंबई हीसुद्धा तेवढीच जबाबदार आहे. त्या कंपनीने जागेचा सर्व्हे, डिझाईन देण्याचे काम केले आहे. कामाचे ठेकेदार गुप्ता कन्स्ट्रक्शन, नागपूर व पोट ठेकेदार मयूर मल्टीटेक, नांदेड हेही जबाबदार आहेत.आतापर्यंत या ठेकेदाराला ७० टक्के रक्कम अदा केली आहे. त्यामुळे त्याला बिल देणारे इंजिनिअर व अधिकारीही तेवढेच जबाबदार आहेत. त्यांनी मिळून शासनाच्या निधीचा अपव्यय केल्याने त्या सर्वांकडून नुकसान भरपाई घेण्यासाठी आगामी अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत शासनाचे लक्ष वेधणार असल्याचे प्रसन्ना देसाई यांनी सांगितले.