दोनशे कुटुंबांवर संकट : समुद्रातील बारदानी वाऱ्याचा परिणाम ; वायंगणी, उभादांडा येथील भागाला फटका वेंगुर्ले : गेले चार दिवस समुद्रातून किनाऱ्याकडे जोरदार बारदानी वारे वाहत असल्याने समुद्राला प्रचंड तुफान आले आहे. यामुळे वेंगुर्ले वायंगणी व उभादांडा येथील समुद्र्र किनाऱ्यावरील सात ते बारा मीटर भाग पूर्णत नष्ट झाला आहे. त्यामुळे खारफुटी व समुद्री झाडे समुद्राच्या पोटात गेली आहेत. परिणामी येथील वस्तीला धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही दिवस जोरदार मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरु आहे. मात्र दोन दिवस समुद्री भागात जोरदार बारदानी वारे वाहत असल्याने समुद्रात तुफान सुरु असून समुद्र खवळल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे मच्छीमारांमध्ये भिती निर्माण झाली असून मासेमारीला पूर्णत: विश्रांती मिळाली आहे. बारदानी वारे जोरदार वाहत असल्याने वायंगणी भागात समुद्र किनारा सात ते बारा मीटर सरकला आहे. येथील सर्व झाडी समुद्राने गिळंकृत केली आहे. सदर घटना वीस वर्षा पूर्वी अशाच पध्दतीने झाली होती. असे येथील मच्छीमारांचे म्हणने आहे. वायंगणी भागातील हुलमेतवाडी, पोयडीवाडी, बागायतवाडी, साळगांवकरवाडी, कांबळीवाडी येथील किनाऱ्या लगतची सर्व समुद्र्री झाडी या तुफानात नष्ट झाल्याने येथील सुमारे २० ते २५ घरांना धोका निर्माण झाला आहे. वेंगुर्ले मत्स्य विभाग, बंदर विभाग, पंतन विभाग यांच्याकडे वायंगणी येथे संरक्षक बंधारा व्हावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी करुनही केवळ जागेचे मोजमाप व कोट्यवधी निधी आल्याचा कांगोरा केला जातो परंतु प्रत्यक्षात संरक्षक बंधारा याकरीता कोणतीच कार्यवाही होत नसल्याने येथील किनाऱ्या लगतची सुमारे दोनशे कुटुंबे यांचा संरक्षणाचा विषय ऐरणीवर आला आहे. दरम्यान, गेली काही वर्षे समुद्रात पावसाळयापुर्वी व पावसाळच्या सुरुवातीस तुफान झालेले नाही. परंतु पावसाळयाची नक्षत्रे संपत असतानाच व १ आॅगस्ट पासून मच्छीमारीस प्रारंभ झाला असतानाच निसर्गाने मच्छिमारांवर अवकृपा केली आहे. यामुळे या समुद्री तुफानाचा फटका मासेमारीवर बसणार आहे. त्यातच गोव्यासह अन्य प्रांतातील ट्रॉलर्स बेकायदेशीरपणे समुद्रात मासेमारी करीत असल्याने स्थानिक मच्छिमारांवर त्याचा परिणाम होत आहे. (वार्ताहर)
किनाऱ्यावरील वस्तीला धोक्याची घंटा
By admin | Published: August 07, 2016 10:45 PM