सिंधुदुर्ग : कुडाळ-दाभोली या वर्दळीच्या रस्त्याच्या बाजूने दमदाटी करून व पोलीस मदतीच्या सहाय्याने महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळातर्फे जबरदस्तीने नवीन ११ केव्हीची विद्युत लाईन घालण्यात येत आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थांचे नुकसान होणार आहे व धोका निर्माण झाला आहे.
यामुळे ग्रामस्थांचा उद्रेक होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे. तरी ही विद्युतलाईन भविष्यातील धोका लक्षात घेऊन भूमिगत पद्धतीने घालून शांततेच्या मार्गाने हा प्रश्न सोडविण्यात सहकार्य करावे, असे निवेदन जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देऊन त्यांचे लक्ष वेधले आहे.कुडाळ-दाभोली या वर्दळीच्या रस्त्याच्या बाजूने नवीन ११ केव्हीची विद्युतलाईन महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळातर्फे घालण्यात येत आहे. या विद्युतलाईनच्या लगत रहिवासी घरे, प्राथमिक शाळा, मंदिरे, शेती आणि बागायती असल्याने स्थानिक ग्रामस्थांचा या विद्युत लाईनकरिता विरोध आहे. तरी संबंधित विद्युतलाईन जास्त क्षमतेची व अतिशय धोकादायक असल्याने ती घरांपासून तसेच प्राथमिक शाळा, मंदिरे यापासून लांब असावी.
स्थानिक ग्रामस्थांना असलेला भविष्यातील धोका विचारात घेता त्यांच्या मागणीनुसार संबंधित लाईन विद्युत खांबावरून न घेता संपूर्णपणे भूमिगत पद्धतीने घेण्यात यावी. याबाबत आपण जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार नीतेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांचे लक्ष वेधले आहेत.मात्र, असे निदर्शनास आले की, हे काम करताना महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाकडून पोलीस दलाचे सहकार्य घेऊन दमदाटीने ही विद्युत लाईन टाकण्याचे काम केले जात आहे. याला स्थानिक ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे.प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवावानवीन ११ केव्ही विद्युत लाईन रस्त्यावरून गेल्याने भविष्यात स्थानिक ग्रामस्थांना धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे स्थानिक ग्रामस्थांना होणारा भविष्यातील धोका विचारात घेता त्यांच्या मागणीनुसार हे काम करण्यात यावे. पोलीस दलाकडून दमदाटीचा वापर न करता सहकार्याच्या भूमिकेने व शांततेच्या मार्गाने ग्रामस्थांची समस्या सोडवावी, अन्यथा उद्रेक झाल्यास व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, विद्युत महामंडळ तसेच पोलीस प्रशासन याला जबाबदार राहील. तरी याबाबत आपण लक्ष घालून शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवावा, असे निवेदन जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांना दिले आहे व त्यांचे लक्ष वेधले आहे.