मालवण : भाजी मंडईतील धोकादायक दुकानगाळ्याचा वापर थांबविण्याचे आदेश देणाऱ्या तत्कालीन मुख्याधिकारी जयंत जावडेकरांनी त्याच हॉटेल वापरासाठी करार असणाऱ्या गाळेधारकास बियर शॉपीसाठी पोटभाडेकरू ठेवण्याची परवानगी दिली. जावडेकर यांनी पालिकेत केलेल्या अनागोंदी आणि मनमानी कारभाराची जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून कारवाई करावी. अन्यथा ५ एप्रिल रोजी पालिकेसमोर उपोषण छेडले जाईल, असा इशारा उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी दिला.उपनगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत गटनेते गणेश कुशे, माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत हेही उपस्थित होते. मुख्याधिकाऱ्यांकडून धोकादायक इमारतीतील अन्य गाळेधारकांना गाळे खाली करण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. मात्र, एकाच गाळ्यासाठी प्रशासनाकडून वेगळा न्याय देण्यात आला.
या संपूर्ण प्रकारची चौकशी करून कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असे कुशे यांनी सांगितले. तो गाळेधारक पालिकेचा जावई आहे का? असा सवालही वराडकर यांनी उपस्थित केला.