खारेपाटण(कणकवली) : गेली दोन दिवस सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रविवारी पहाटे मुंबई - गोवा महामार्गावरील कणकवली तालुक्यातील खारेपाटण - नडगीवे घाटी येथे महामार्गावरच दरड कोसळली. यामुळे सर्वत्र माती पसरून काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. तर एकेरी मार्गाने वाहतूक सुरू होती.याबाबत अधिक वृत्त असे की, खारेपाटण पासून जवळ असलेल्या नडगीवे घाटीत अतिवृष्टी मुळे आदीष्टी मंदिर पासून अगदी जवळ असलेली महामार्ग लगतची एक दरड कोसळली. या दरम्यान कोणतेही वाहन महामार्गावर नसल्याने कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही.
ही घटना सार्वजनिक बांधकाम विभाग खारेपाटण कार्यलयाला समजताच मुंबई गोवा महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने मजुरांच्या मदतीने व जे सी बी च्या सहाय्याने कोसळलेली दरड तातडीने हटविण्यात आली व महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.अशाच प्रकारे मुसळधार पावसाचे प्रमाण राहिल्यास अजूनही काही ठिकाणचा दरडीचा भाग कोसळण्याची दाट शक्यता असून महामार्गाच्या बाजूने असलेले विद्युत खांब व वीज वाहिन्या यांना यामुळे धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे मुंबई गोवा महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने दरड कोसळण्याचे संभाव्य धोके टाळण्यासाठी नडगीवे घाटीत कायमस्वरूपी मजबुत संरक्षक भिंत बांधणे काळाची गरज आहे.