सावंतवाडी : कोलगाव कासारवाडी येथील विहिरीत दोडामार्ग-झोळंबे येथील दर्शना अत्माराम गवस हिचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रथमदर्शनी ही आत्महत्या वाटत असली तरी तो घातपात असून, तिला विहिरीत ढकलून दिले आहे. त्यामुळे हा मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा तिचा भाऊ महेश गवस याने घेतला आहे.
ती ज्याच्याबरोबर रहात होती त्याच्या मागील प्रकरणाचा तपास केला असता हा घातपातच आहे. माझ्या बहिणीने ज्याच्याशी लग्न केले त्याला समोर आणा, अशी मागणीही केली आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी आत्महत्या वाटत असलेल्या या प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे.मूळची दोडामार्ग-झोळंबे येथील दर्शना ही गेले दहा महिने कोलगाव येथील स्नेहल राऊळ यांच्याकडे रहात होती. तिने काही महिन्यांपूर्वी आपले लग्न कोलगाव येथील पप्पू माईणकर यांच्याशी झाल्याचा फोन आपल्या नातेवाईकांना केला होता. त्यानंतर त्या नातेवाईकांनी पप्पू माईणकर यांच्याशी संपर्कही केला होता.
त्यावेळी तिने लग्नाबाबत माहितीही दिली होती. मात्र नंतर तिचा संपर्कच झाला नव्हता. मात्र, गुरुवारी पहाटे साडेपाच वाजेपर्यंत दर्शना ही घरात होती. त्यानंतर ती घरातून बाहेर पडली. ती परत आलीच नसल्याने तिची शोधाशोध केली असता तिचा मृतदेह कोलगाव कासारवाडी येथील विहिरीत आढळून आला.याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच त्यांनी दर्शना हिचा भाऊ महेश गवस याला माहिती दिली. त्यानंतर महेश व त्याचा काका भरत गवस हे दोघेही कोलगाव येथे दाखल झाले. त्यानंंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यावेळी मृत दर्शनाच्या गळ्यात मंगळसूत्र असल्याने तिने लग्न केल्याचे पुढे आले.
त्यामुळे तिच्या पतीला समोर आणा अशी मागणी दर्शनाच्या नातेवाईकांनी केली. तसेच पप्पू माईणकर कोण तोही पुढे आणा असे सांगितले. त्यावेळी पप्पू माईणकर हा पुरूष नसून स्त्री असल्याचे पोलिसांसमोर आले. त्यामुळे दर्शनाचे नातेवाईक चांगलेच चक्रावून गेले.घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह सांयकाळी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतदेहाचे विच्छेदन केले. मात्र, रूग्णालय परिसरात मृत दर्शनाचे नातेवाईक मोठ्या संख्येने जमू लागले.
यात माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णींसह पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. यावेळी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासो बाबर, महिला पोलीस अधिकारी स्वाती यादव, अमोल सरंगले यांच्यासमोर नातेवाईकांनी संशय व्यक्त केला.ही आत्महत्या नसून घातपातच आहे.
आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही. आमच्या मुलीची फसवणूक झाली आहे. पप्पू माईणकर कोण याचा शोध घ्या. तसेच स्त्रीच्या वेशात असणारी व्यक्ती दर्शनाचा पती कसा असू शकतो? त्यामुळे याप्रकरणाच्या मुळाशी पोलिसांनी गेले पाहिजे आणि शोधाशोध करा. तरच आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ असे स्पष्ट सांगितले.पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी या प्रकरणी पूर्ण चौकशी केली जाईल. तसेच ज्याच्यावर तुमचा संशय आहे त्याची मागची पार्श्वभूमी तपासली जाईल असे सांगितले. मात्र, त्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेत नाडकर्णींसह मृत दर्शनाचा भाऊ महेश गवस, भरत गवस, अक्षता गवस यानी पोलिसांची मागणी फेटाळून लावली.दरम्यान, उशिरा पोलिसांनी मृत दर्शनाच्या नातेवाईकांना संशय होता अशाची चौकशी सुरू केली आहे. मात्र, उशिरापर्यंत त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती.संशयितांना अटक करा, मगच मृतदेह ताब्यात; मृत्यू पाण्यात बुडूनच!दर्शना गवस हिचा मृत्यू पाण्यात बुडून झाला आहे. त्यात कोणताही घातपात दिसत नाही असा प्रथमदर्शनी अहवाल वैद्यकीय अधिकारी ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांनी दिला आहे. नातेवाईकांनी केलेली इन कॅमेरा चौकशी करण्याची मागणी पोलिसांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली. तसेच नातेवाईकांनीही नंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवत मृतदेहाचे पुन्हा विच्छेदन नको असे सांगितले.दर्शना गवस हिचा मृत्यूमागे मोठे षड्यंत्र आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करा अशी मागणी मृत दर्शनाचा भाऊ महेश गवस यांनी केली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीला अटक व्हायला हवी. त्याच्यावर यापूर्वी गेळेप्रकरणी गुन्हे दाखल होते. तेव्हा त्याला अटक करण्यात आली होती. त्यामुळे माझ्या बहिणीलाही त्याने मनासारखे वागत नसल्याने मारून टाकले नाही कशावरून? त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करा आणि त्यांना अटक करा, अशी मागणी महेश गवस यांनी केली आहे.