वैभववाडी : हेत शेवरीफाटा येथील मारहाणीत दत्ताराम मोरे याचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत त्याच्या मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मौदे ग्रामस्थांनी सुरू केलेले उपोषण रात्री उशिरा स्थगित केले.
दत्तारामचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्यात संशयास्पद बाब आढळल्यास संशयितांवर निश्चित कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांनी मौदे ग्रामस्थांना दिले आहे.२६ जानेवारीला दत्ताराम मोरे याला मारहाण झाली होती. मारहाण करणाऱ्या संशयितांची नावे त्याने वृद्ध आई सुमित्रा हिला सांगितली होती. त्यानंतर त्याला अत्यवस्थ स्थितीत कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारांदरम्यान २९ जानेवारी रोजी त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मौदे ग्रामस्थ आक्रमक झाले होते. त्यांनी दत्तारामच्या मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी करीत अंत्यविधी लांबविला होता.त्यानंतर त्याच्या मारेकऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी मौदे व आखवणे येथील ग्रामस्थांनी श्री बावचादेवी मंदिरात उपोषण सुरु केले होते. उपोषणाला पाठींबा म्हणून मौदेतील शाळाही बंद ठेवण्यात आली होती.दरम्यान, दिवसभर कोणीही अधिकारी या उपोषणस्थळी फिरकले नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले होते. मात्र, सायंकाळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांनी उपोषणस्थळी भेट देत ग्रामस्थांशी चर्चा केली.
ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेत बाकारे यांनी ग्रामस्थांच्या सर्व शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले. त्यामुळे रात्री उशिरा ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केले.