सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक व सध्याचे मीरा-भाईंदर, वसई- विरार येथील अपर पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत असलेले दत्तात्रय तुळशीदास शिंदे यांना पोलिस दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती यांच्याकडून 'गुणवत्तापूर्ण सेवा पदक' देऊन गौरविण्यात आले आहे.दत्तात्रय शिंदे हे चिंचोली (ता. बार्शी) येथील ग्रामीण भागातील सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील असून त्यांनी एम.एस.सी. (कृषी), जी.डी.सी. ए.डी.सी.ए., एल.एल.बी. हे शिक्षण पूर्ण केलेले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत त्यांनी १९९६ साली महाराष्ट्र पोलिस दलात पोलिस उपअधीक्षक म्हणून उत्तीर्ण झाले होते. प्रशिक्षण कालावधीनंतर अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोलीतून त्यांनी पोलिस दलातील सेवेला सुरुवात केली होती. नंतर गोंदिया, सोलापूर शहर, मुंबई येथे सहायक पोलिस आयुक्त व पदोन्नतीने पोलिस उपायुक्त म्हणून मुंबई, फोर्स वन ला सेवा बजावल्यानंतर त्यांची आयपीएसपदी बढती मिळाल्यानंतर सांगली, सिंधुदुर्ग, पालघर पोलिस अधीक्षक म्हणून सेवा बजावली आहे. सध्या पदोन्नतीने ते मीरा-भाईंदर, वसई-विरार येथे अप्पर पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी आतापर्यंत पोलिस विभागात विविध क्षेत्रामध्ये व शाखामध्ये प्रभावी कामगिरी केलेली आहे. नक्षलग्रस्त भागामध्ये नक्षलविरोधी अभियाने राबवणे. मटका व संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर तडीपारीची कारवाई खंबीरपणे केलेली आहे. तसेच ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी ''डॉल्बीमुक्तीतून जलयुक्तकडे'' महिला सुरक्षेकरिता ''निर्भया सायकल रॅली'' आयोजन, महिला सुरक्षेकरिता ''निर्भया पथकाची निर्मिती'' ह्या नावीन्यपूर्ण व लोकसहभागाच्या योजना राबविल्या आहेत.
पोलिस दलातील सर्वच विभागांत उत्कृष्ट कामगिरीपोलिस दलासाठी आव्हानात्मक असलेल्या सर्व विभागांमध्ये व विशेष दलामध्ये उत्कृष्ट कामगिरी त्यांनी केलेली आहे. आतापर्यंत शासनाने केंद्र व राज्य शासनाने विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेले आहे. त्यातच आणखी एक भर पडली असून, त्यांच्या आतापर्यंतच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपतींनी 'राष्ट्रपती पदक' देऊन गौरवले आहे.