वैभववाडी - वनौषधींच्याद्वारे लोकांची प्रकृती ठणठणीत करणा-या आचिर्णे धनगरवाडा येथील १०४ वर्षीय वैदू आजी गंगुबाई जनू बोडके यांचे निधन झाले. आचिर्णेतील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.गंगुबार्इंनी चार पिढ्या एकत्र कुटुंब पद्धतीत नांदवल्या. कुटुंबाचा शेळ्यांचा पारंपरिक व्यवसाय असल्यामुळे त्यांचे सतत जंगलात फिरणे असायचे. आई, वडील आणि त्यानंतर सास-यांकडून त्यांना जंगलातील वनौषधींचे ज्ञान मिळाले होते. डोळ्यातील दोष, अर्धशिशी (डोकेदुखी), पोटदुखी, कावीळ यांसह विविध आजारांवर त्या रामबाण औषध देत होत्या.जंगलातील काट्याकुट्यात फिरून त्या वनौषधी गोळा करीत असत. आपल्याकडे येणा-या प्रत्येकाची प्रकृती ठणठणीत बरी करण्यासाठी सतत प्रयत्न करणा-या या वैदू आजीची प्रकृती शंभरीनंतरही ठणठणीत होती.जानेवारी २०१८ मध्ये गंगुबार्इंना १०३ वर्षे पूर्ण झाली. मात्र गेल्या दीड-दोन महिन्यांपासून वृद्धापकाळामुळे त्या अंथरुणाला खिळून होत्या. त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नव्हती. बुधवारी सायंकाळी या वैदू आजीने जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे, पणतवंडे असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते संतोष बोडके यांच्या त्या आजी होत.
आचिर्णेतील १०४ वर्षीय वैदू आजीचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 9:11 PM