वैभववाडी : वेळेत उपचार होऊ न शकल्याने उंबर्डे मेहबूबनगर येथील गुलामअली आरीफ पाटणकर या एका महिन्याच्या बालकाचा अंत झाला. ही घटना शुक्रवारी रात्री १ च्या सुमारास घडली. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र, या पार्श्वभूमीवर शनिवारी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मेहबूबनगर येथे जावून प्राथमिक सर्व्हे केला. शायदी आरीफ पाटणकर या महिलेने ४ आॅगस्ट २०१५ रोजी गुलामअली या बालकास जन्म दिला. प्रसुतीनंतर एक महिन्याने शायदी पाटणकर शुक्रवारी आपल्या कोळपे येथील माहेरी राहण्यासाठी गेल्या होत्या. रात्री १ च्या सुमारास बाळाला त्यांनी स्तनपान केले. त्यानंतर काहीवेळाने बाळाची तब्येत बिघडली. नातेवाईकांनी त्याला थेट वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्याच्यावर उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, तेथे उपचार करणे सोडाच पण बालकाला दाखलच करुन घेतले नाही. त्यामुळे त्याला कणकवली येथे घेऊन जात होते. मात्र, कणकवलीत पोहचण्यापूर्वीच गुलामअली या बालकाचा जीवनप्रवास संपला. जिल्'ात सध्या डेंग्यू, स्वाईन फ्लूने थैमान घातले असताना वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवा मृत्यूशय्येवर आहे. त्यामुळेच उंबर्डेतील गुलामअली या बालकाला प्राण गमवावा लागला. तरीही जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क असल्याचे भासवले जात आहे. मात्र, याच आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे एका बालकाला आपला जीव गमवावा लागला, हे कटूसत्य आरोग्य यंत्रणा मान्य करणार का? हा प्रश्न तर आहेच, पण खासगी रुग्णालयात जरी उपचार झाले असते तरीही कदाचित गुलामअलीचे प्राण वाचले असते, असे ग्रामस्थांतून बोलले जात आहे. (प्रतिनिधी)
उंबर्डेतील बालकाचा मृत्यू ; कारण अस्पष्ट
By admin | Published: September 05, 2015 11:47 PM