रत्नागिरी/खेड : शहराजवळील कर्ला गावात स्वाईन फ्ल्यूचे दोन रुग्ण सापडले असून, त्यातील एका महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची धावपळ उडाली असून, या भागातील १२७३ घरांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी भेटी देऊन तपासणी केली. खेड येथील एका युवतीचाही स्वाईन फ्लूमुळे बळी गेला आहे. तिला उपचारासाठी मिरज येथे एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंबई, पुणे शहरानंतर आता रत्नागिरी जिल्'ात स्वाईन फ्लूने डोके वर काढले आहे. लेप्टो व स्वाईन फ्ल्यूबाबत काळजी घेतली जावी, यासाठी आरोग्य विभागाकडून जोरदार प्रचार, प्रसार मोहीम राबविण्यात येत आहे. स्वाईन फ्लूचे रूग्ण आढळल्यानंतर आता आरोग्य विभागाने सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना सतर्कतेची सूचना दिली आहे. सुलताना तौफिक मुकादम (३२, कर्ला) आणि निकिता नितीन बोरकर (३८, भंडारवाडी, कर्ला) या स्वाईन फ्लूच्या रूग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना सुलताना या विवाहितेची तब्येत अधिकच बिघडल्याने तिला २ सप्टेंबर रोजी अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरु असतानाच तिचे निधन झाले. दुसरी रूग्ण निकिताच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली असून, तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. या दोघींचेही रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. अहवालानंतर त्या दोघींनाही स्वाईन फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर जिल्हा परिषद आरोग्य विभागाने कर्ला भागामध्ये सर्वेक्षण सुरु केले असून, आतापर्यंत १२७३ घरांमध्ये ५६८५ नागरिंकांची तपासणी केली. त्यामध्ये एकही संशयित सापडला नसून किरकोळ तापाचे १३ रुग्ण आढळून आले. त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले आहेत. दरम्यान, खेड तालुक्यातील आष्टी गावाची रहिवासी असलेली अल्फिया इरफान चौगुले (१७) हिचे स्वाईन फ्लूमुळे निधन झाले. ती खेड येथील हाजी एस. एम. मुकादम कनिष्ठ महाविद्यालयात शिकत होती. १0 दिवसापूर्वी अल्फिया तापाने आजारी पडली होती. तिला उपचाराकरीता येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र तिच्या प्रकृतीमध्ये फारसा फरक दिसत नव्हता. तिला मिरजेतील एका खासगी रूग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना तिचे निधन झाले. (शहर वार्ताहर)
स्वाईन फ्लूमुळे दोघांचा मृत्यु
By admin | Published: September 05, 2015 11:52 PM