वैभववाडी : कुसूर मधलीवाडी येथील नवविवाहिता भक्ती भरत पाटील मृत्यू प्रकरणी तिचा पती भरत वसंत पाटील याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. दरम्यान, तिची सासू वनिता वसंत पाटील दीड वर्षाच्या नातवासह अद्यापही पसार आहे.भक्ती पाटील ही १० एप्रिलला पहाटेच्या सुमारास गंभीररित्या भाजली होती. तिने तब्बल बारा दिवस मृत्यूशी दिलेली झुंज अयशस्वी ठरली. अखेर २२ रोजी रात्री कोल्हापुरात उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. दरम्यानच्या काळात तिचा भाऊ सूरज तळेकर याने भक्तीच्या अत्यवस्थ परिस्थितीला तिचा पती व सासूला जबाबदार धरीत विवाहानंतर जेमतेम सहा महिन्यांनी चारित्र्याच्या संशयावरुन भक्तीला पती भरत आणि सासू वनिता यांनी तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरु केला होता. त्यामुळे ती कशी भाजली याची चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडे केली होती.
सूरजच्या तक्रारीनुसार वैभववाडी पोलिसांनी १५ एप्रिलला कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना भक्तीचा जबाब नोंदवला. त्या जबाबात तिने पती व सासूच्या छळाला कंटाळून स्वत:ला पेटवून घेतल्याचे पोलिसांना सांगितले. तो भक्तीचा मृत्यूपुर्व शेवटचा जबाब ठरला. त्यामुळे तिच्या भावाची रितसर तक्रार नोंदवून भक्तीचा पती भरत व सासू वनिता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन भरतला अटक केली. तर तिची सासू पसार झाली आहे.भरत याला सुरुवातीला २ व त्यानंतर ४ दिवस पोलीस कोठडी मिळाली होती. दुसऱ्यांंदा मिळालेल्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे सोमवारी पोलिसांनी त्याला कणकवली न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान भक्तीची सासू वनिता पाटील नातवासह पसार आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे करीत आहेत.