लोकमत न्यूज नेटवर्ककुडाळ : आपल्या शेतातील आग शेजारच्या परड्यात जाऊ नये म्हणून ती आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात हिर्लोक-भटवाडी येथील लक्ष्मण ऊर्फ न्हानू हरी परब (वय ५७) यांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना हिर्लोक-आंब्याचे गाळू परिसरात घडली.हिर्लोक-आंब्याचे गाळू येथे लक्ष्मण परब यांची शेतजमीन आहे. पावसाळ्यापूर्वी शेतजमिनीत पालापाचोळा जाळून साफसफाई केली जाते. मंगळवारी दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण परब यांनी साफसफाई करून आग लावली; पण थोड्याच वेळात ही आग मोठ्या प्रमाणात पसरली. ती बाजूच्या परड्यात जाऊन तेथील मांगराला धोका होईल, या भीतीने त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नात त्यांच्या अंगावरील पॅन्टने पेट घेतला. परिसरात ते एकटेच असल्याने त्या आगीमध्ये होरपळून त्यांचा मृत्यू झाला. दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास काही ग्रामस्थ या परिसरात गेले असता ही घटना त्यांच्या निदर्शनास आली. मृत लक्ष्मण परब यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व अन्य परिवार आहे. त्यांची पत्नी बाहेरगावी गेली होती. घटनेची माहिती मिळताच कुडाळचे पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण गवस व पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. सायंकाळी उशिरापर्यंत पंचनाम्याची व गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.जिल्ह्यात मान्सूनपूर्व मशागतीची कामे जोरात सुरू असून, जमीन भाजणीसाठी झाडपाला आणि शेणखताचा वापर केला जात आहे. जमीन सुपीक बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाजणी सुरू आहे. अशातच ही दुर्दैवी घटना घडल्याने शेतकऱ्यांनी आगीपासून संरक्षणासाठी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.
आग आटोक्यात आणताना एकाचा मृत्यू
By admin | Published: May 23, 2017 11:21 PM