मालवण : साळेल नांगरभाट येथील आंबा व्यापारी आणि लाकूड व्यावसायिक लक्ष्मण उर्फ बाबल विठोबा साळकर (६५) यांच्यावर पेटते वडाचे झाड कोसळून झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. साळकर हे नांगरभाट येथून कट्टा येथे दुचाकीने जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. हा अपघात गुरुवारी सायंकाळी ५ वाजता घडला.
मालवण-कसाल राज्यमार्गावरील साळेल कुपेरी घाटी येथे अज्ञाताने गुरुवारी सकाळी आग लावली होती. त्यात राज्यमार्गालगतची झाडे आगीच्या तांडवात जळून भस्मसात झाली होती. कुपेरी घाटी येथील काटरोबा देवस्थाननजीक रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेले वडाचे झाड आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते.
त्याच दरम्यान कट्टा येथे कामानिमित्त दुचाकीने जात असलेल्या लक्ष्मण साळकर यांच्या डोक्यावर पेटते वडाचे झाड कोसळले. यात ते रस्त्यावर फेकले गेले. डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घरापासून हाकेच्या अंतरावरील घटना
लक्ष्मण साळकर हे कट्टा दशक्रोशीत बाबल साळकर म्हणून परिचित आहेत. त्यांचा लाकूड व आंबा व्यवसाय आहे. साळकर हे नेहमीप्रमाणे आपल्या घरातून कट्टा येथे जाण्यास निघाले. घरापासून कट्ट्याच्या दिशेने अवघ्या एक किलोमीटर अंतरावर ते गेले असता त्यांच्यावर काळाने घाला घातला. साळकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, चार मुली, भाऊ, भावजय, पुतणे, जावई असा परिवार आहे. चिरे व्यावसायिक राजू साळकर यांचे ते वडील होत.
अपघातानंतर दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी
पेटते वडाचे झाड रस्त्यावर कोसळून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्यानंतर राज्य मार्गावर दोन्ही बाजूने सुमारे एक तास वाहतूक कोंडी झाली होती. दुचाकीस्वार साळकर यांच्यावर झाड पडल्यानंतर तत्काळ १०८ रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. मात्र, साळकर यांचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थ, तसेच कणकवली येथे जाहीर सभेला जात असणाºया शिवसैनिकांनी मदतकार्य केले. अपघातस्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
कट्टा पंचक्रोशीत पसरली शोककळा
पोलीस निरीक्षक विनित चौधरी यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. सायंकाळी उशिरा साळकर यांचा मृतदेह मालवण ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी ठेवण्यात आला होता. साळकर यांच्या निधनाने वृत्त समजताच कट्टा पंचक्रोशीत शोककळा पसरली होती.