नांदगाव : मुंबई-गोवा महामार्गावर नांदगाव कोळंबा मंदिराजवळ मंगळवारी रात्री ८.३० वाजता भुईबावडा येथील पार्वती आत्माराम मोरे (वय ५५, रा. भुईबावडा आंबेवाडी) ही महिला बेशुद्ध अवस्थेत सापडली. अधिक उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रूग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाला.नांदगाव कळंबा मंदिरानजिक मंगळवारी रात्री ८.३० वाजता एक महिला बेशुद्ध अवस्थेत असलेली ट्रक चालकाला निदर्शनास आली. त्या ट्रक चालकाने ही बातमी नांदगाव येथील ग्रामस्थांना दिली. यावेळी नांदगाव येथील एकता सहा आसनी रिक्षा संघटनेच्या रूग्णवाहिकेने तिला उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रूग्णालयात नेत असता वाटेतच तिचा मृत्यू झाला. यावेळी त्या महिलेचा मृतदेह कणकवली उपजिल्हा रूग्णालयातील शवागृहात ठेवण्यात आला. रात्री उशीर झाल्यामुळे व ओळख न पटल्याने एक रात्र मृतदेह कणकवली उपजिल्हा रूग्णालयात ठेवण्यात आला. बुधवारी सकाळी नातेवाईकांनी कणकवली येथील रूग्णालयात धाव घेत ओळख पटवली. यावेळी त्या महिलेचे नाव पार्वती आत्माराम मोरे असून भुईबावडा आंबेवाडी येथील असल्याचे समजले. नातेवाईकांनी ओळख पटल्यावर शवविच्छेदन करण्यात आले व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. महिलेचा मृत्यू मेंदूतून रक्तस्त्राव झाल्यामुळे झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र ही महिला नांदगाव येथे कशी आली, हे अद्याप समजू शकलेले नाही. अधिक तपास कासार्डे दूरक्षेत्राचे पोलीस ए. एस. गोसावी व सी. टी. झोरे करीत आहेत. (वार्ताहर)
बेशुद्ध अवस्थेतील महिलेचा अखेर मृत्यू
By admin | Published: July 10, 2014 12:07 AM