दोडामार्ग : भरधाव वेगाने वाळू वाहतूक करणारा डंपर दोन्ही पायांवरून गेल्याने गंभीर जखमी झालेल्या शुभांगी चंद्रकांत सोंदेकर (४२, रा. दोडामार्ग बाजारपेठ) यांचा बांबोळी-गोवा येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघात घडताच डंपर तेथेच टाकून चालकाने पळ काढला. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने डंपरच्या काचा फोडल्या. हा अपघात शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास घडला. फरारी झालेल्या डंपर चालकावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, वटपौर्णिमेच्या दिवशी तालुक्यातील सुवासिनी वटसावित्रीचे व्रत करीत असताना त्याच दिवशी एका सुवासिनीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ येणारी दुर्घटना घडल्याने तालुका सुन्न झाला आहे.
शुभांगी सोंदेकर या आपले पती चंद्रकांत सोंदेकर यांच्यासोबत बांदा येथे गेल्या होत्या. त्यांची विवाहित मुलगी मुंबई येथे जाण्यासाठी निघाली होती. तिला सोडण्यासाठी त्या बांद्यात गेल्या होत्या. त्यानंतर घरी परतत असताना मणेरी-कुडासे तिठा येथे शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. यात शुभांगी रस्त्यावर कोसळल्या, तर त्यांचे पती बाहेर फेकले गेले.
डंपरची डाव्या बाजूची दोन्ही चाके शुभांगी यांच्या पायावरून गेली आणि कमरेतूनच त्यांचे पाय जायबंदी झाले. या अपघातानंतर डंपर तेथेच ठेवून चालकाने पळ काढला. तोपर्यंत घटनास्थळी जमलेल्या स्थानिक ग्रामस्थांनी १०८ रुग्णवाहिकेला कळवून जखमी शुभांगी सोंदेकर यांना दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बांबोळी-गोवा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना रात्री १२.३० च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. मृत शुभांगी यांच्यावर रविवारी उशिरा त्यांच्या मूळ गावी पडवे-माजगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.संतापलेल्या जमावाकडून डंपरची मोडतोडदरम्यान, अपघात घडल्याची माहिती देऊनही दोडामार्ग पोलीस घटनास्थळी उशिरा दाखल झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने अपघातग्रस्त डंपरची मोडतोड केली. या अपघाताची नोंद दोडामार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, फरार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.