कुडाळ : बिबवणे येथील महामार्गावरील खड्ड्यांत मोटारसायकल गेल्याने झालेल्या अपघातात रेडी-बोमडोजीचीवाडी येथील कीर्ती कृष्णा बागायतकर (वय ३७) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुदैवाने या अपघातात कीर्ती यांचा एक वर्षाचा मुलगा बचावला, तर मोटारसायकल चालविणारे त्यांचे पती कृष्णा बागायतकर यांना किरकोळ दुखापत झाली. रेडी-बोमडोजीचीवाडी येथील कृष्णा बागायतकर सावंतवाडी येथील काम दुपारी आटोपूून कुडाळला येत होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी कीर्ती व एक वर्षाचा मुलगा गजानन होता. ते बिबवणे येथे आले असता महामार्गावर असलेल्या खड्ड्यामध्ये त्यांची दुचाकी जोराने आदळल्याने मागे बसलेल्या कीर्ती व त्यांचा मुलगा गजानन डांबरी रस्त्यावर फेकले गेले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. दरम्यान, अपघाताची बातमी कळताच बिबवणे येथील ग्रामस्थांनी तसेच काही युवकांनी तत्काळ अपघातस्थळी पोहोचून तिघांनाही कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, पण डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्यामुळे उपचार सुरू असताना कीर्ती यांचा मृत्यू झाला. या अपघातात रस्त्यावर पडून देखील गजाननच्या हाताला थोडेफार खरचटण्यापलीकडे अन्य कोणत्याही स्वरूपाची दुखापत झाली नाही. (प्रतिनिधी) चौकट चौकट आईसाठी गजाननचा टाहो.... कुडाळ ग्रामीण रुग्णालयात या तीनही जखमींना उपचारासाठी आणल्यानंतर खूप वेळ झाला, तरी गजाननला त्याची आई दिसली नाही. त्यामुळे आईसाठी त्याने फोडलेला टाहो हा हृदय हेलावणारा होता. त्यामुळे रुग्णालयातील परिसर भावनाविवश झाला होता. ग्रामस्थांचा आधार आणि आपुलकी बिबवणे येथील ग्रामस्थांसह नगरसेवक एजाज नाईक यांनी रुग्णालयात नेण्यासाठी सहकार्य केले. मुख्य मार्गावरील या अपघातावेळी ग्रामस्थांनी तत्काळ केलेली मदत वाहनधारकांना मोठा आधार देणारी ठरली, तर अपघातग्रस्तांना मायेची आपुलकी मिळाली. ...तर प्राण वाचले असते बिबवणे येथील खड्डा डांबरीकरणाने बुजवून टाकावा. जेणेकरून येथे मोठा अपघात होऊ नये, अशी मागणी येथील ग्रामस्थांची वारंवार होती. मात्र, महामार्ग विभाग व बांधकाम विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. कीर्तीचा या खड्ड्यांमुळेच नाहक बळी गेला. या खड्ड्यामुळे आणखी कितीजणांचे प्राण घेतल्यावर प्रशासनाचे डोळे उघडणार आहेत, असा सवाल संतप्त जनतेतून केला जात आहे.
दुचाकी अपघातात महिलेचा मृत्यू
By admin | Published: June 26, 2016 12:31 AM