मालवण - मालवण तालुक्यातील गोळवण खराचे टेंब परिसरात नवीन वीज वाहिनी जोडणीचे काम करत असताना वीज खांबावरून पडून कंत्राटी कामगाराचा जागीच मृत्यू झाला. वीज वाहिनी ताणण्यासाठी सिमेंटच्या खांबावर काम करत असताना खांबासहीत कामगार खाली कोसळला. यात त्याच्या छातीला व शरीराच्या अन्य भागाला जबर मार बसला. गोळवण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यापूर्वी कामगाराचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. दिलीप किशन उईटे (२५, रा. मध्यप्रदेश, सध्या रा. कट्टा) असे या कंत्राटी कामगाराचे नाव असून ही दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी ३.३० वाजता घडली. याबाबत मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गोळवण खराचे टेंब परिसरात गेले पंधरा दिवस नवीन वीजवाहिन्या टाकण्याचे काम एका खासगी कंपनीकडून सुरु आहे. मुकादम गणेश डग यांच्या मार्गदर्शनाखाली तीस कर्मचारी या परिसरात काम करत होते. शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वीजवाहिन्या टाकण्यासाठी दिलीप उईटे हा कामगार सिमेंटच्या वीज खांबावर चढला. याचवेळी वीज खांबवरून तुटल्याने दिलीप खांबासहित जमिनीवर आदळला. यात त्याच्या छाती व शरीराला जबर मार बसला. त्यानंतर मुकादम गणेश डग व अन्य कामगारांनी स्थानिक ग्रामस्थांना कल्पना दिली. यावेळी माजी सरपंच सुभाष लाड, दादा नाईक, साबाजी गावडे, सरपंच प्रज्ञा चव्हाण, पूर्णानंद नाडकर्णी यांनी दिलीप याला गोळवण आरोग्यकेंद्रात तत्काळ हलविले. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीपकुमार यादव यांनी सांगितले.
याबाबत डॉ. यादव यांनी मालवण पोलीस ठाण्यात माहिती दिली असता कट्टा पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण, पाटील, कट्टा दूरक्षेत्राचे उत्तम आंबेरकर, योगेश सराफदार, स्वप्नील तांबे यांनी पंचनामा केला. यावेळी वीज वितरणचे सहाय्यक अभियंता सुजित शिंदे, तंत्रज्ञ किरण पाटील हे उपस्थित होते. कंत्राटी कामगारांचे मुकादम गणेश डग यांनी मृताची जबाबदारी घेतली. मयत दिलीप याच्या मृतदेहावर ओरोस जिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदन करून मुकादमाच्या ताब्यात देण्यात येणार आहे. याबाबत मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.