आंबोली (सिंधुदुर्ग) : आंबोली-महादेवगड या पर्यटन स्थळाच्या पायथ्याशी असलेल्या सिद्धेश्वर देवस्थानांचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या ओवळीये वरचीवाडी येथील तरुण विश्वास गणू सावंत (४०) यांचा खोल दरीत कोसळून मृत्यू झाला.
विश्वास हे पायवाट उतरत असताना पाय घसरून तोल गेल्याने सुमारे तीस फूट खाली खडकाळ दरीत ते कोसळले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर मार बसला. ही घटना रविवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या मित्रांनी याबाबत आंबोली पोलिसांना माहिती दिली.
सोमवारी सकाळी सुहास सावंत, सखाराम सावंत, शशांक सावंत, नीतेश सावंत, राजेश सावंत व विश्वास देसाई हे मित्रमंडळी दरवर्षी सिद्धेश्वर येथे एक रात्र मुक्काम करण्यासाठी म्हणून जात असत. यावेळीही हे मित्र आपल्या चारचाकी वाहनाने दाणोली बाजार येथे जेवणाचे साहित्य खरेदी करून आंबोली महादेवगड येथे पोहोचले. त्यांनी महादेवगड येथूनच खाली पारपोली गावाकडे जाणाऱ्या दरीतील पायवाटेने मार्गक्रमण सुरू केले.
सुमारे दीडशे फूट दरीतील रस्ता उतरल्यावर राजेश सावंत यांच्या मागे असलेला विश्वास देसाई यांचा पाय घसरला व तो तीस फूट खाली दरीमध्ये कोसळला. लागलीच त्याच्या मित्रांनी त्याला पायवाटेवरून खाली जात मोबाइल बॅटरीच्या उजेडमध्ये त्याचा शोध घेतला.
त्यावेळी विश्वास हा एका झाडीमध्ये निपचित पडलेला आढळून आला. त्यांनी विश्वासला खाली घेतले व वाटेवर ठेवले परंतु कोणती हालचाल त्यांच्यामध्ये आडळून आली नाही . तो जागीच मृत झाला असावा असा अंदाज त्यांच्या मित्रांनी बांधला.यानंतर सुहास सावंत यांनी आपल्या इतर मित्रांना विश्वास जवळ ठेवून आंबोली पोलीस स्थानकात रात्री दहा वाजताच्या सुमारास याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विश्वास सावंत व कॉन्स्टेबल राजेश गवस यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. परंतु रात्रीच्या अंधारात बचाव कार्य करणे शक्य नसल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी मोहीम राबवून त्यांना दरीतून बाहेर काढण्यात आले.ओवळीये गावच्या जत्रेदिवशीच दुर्घटनाआंबोली आपत्कालीन व्यवस्थापनाचे मायकल डिसोजा, राजू राऊळ, उत्तम नार्वेकर, अजित नार्वेकर, विशाल बांदेकर, अतुल बांदेकर यांनी सोमवारी सकाळी दहा वाजेपर्यंत ही मोहीम पार पाडली. तसेच विश्वास देसाई यांचा मृतदेह दरीतून वर आणला.
विश्वास हे ओवळिये गावामध्ये मोलमजुरीचे कामे करत असत. त्यांच्या पक्षात आई, वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. नेमकी सोमवारी सोमवारी ओवळीये गावाची जत्रा असल्याने या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली होती. या घटनेबाबत अधिक तपास विश्वास सावंत पोलीस कॉन्स्टेबल राजेश गवस करत आहेत.