सिंधुदुर्गनगरी, 28 : कुडाळ तालुक्यातील तुळसुली गौतमवाडीसाठी दोन वर्षांपूर्वी मंजूर असलेल्या नळपाणी योजनेचे काम ठेकेदार व तुळसुली तर्फ माणगाव ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळे रेंगाळले आहे. येत्या आठ दिवसांत यावर यशस्वी तोडगा काढून समस्या मार्गी लावावी. अन्यथा १६ आॅक्टोबर रोजी होणाºया ग्रामपंचायत निवडणुकीवर आमचा बहिष्कार असेल, असा इशारा आदर्श युवा कला-क्रीडा मंडळ तुळसुली गौतमवाडी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना दिला आहे.
जिल्हाधिकाºयांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गौतमवाडी येथे मंजूर असलेली नळपाणी योजना दोन वर्षांपासून रेंगाळत पडली आहे. याबाबत आपण तुळसुली तर्फ माणगाव ग्रामपंचायतीकडे विचारणा केली असता त्याची कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. संबंधित ठेकेदाराकडूनदेखील चालढकलपणा केला जात आहे.
या वाडीतील महिला व ग्रामस्थ गेल्या दहा ते बारा वर्षांपासून पाणी व नळपाणी योजनेपासून वंचित आहेत. तब्बल एक किलोमीटर अंतरावरून विहिरीतील पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे महिलावर्गाला याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तरी या मंजूर असलेल्या व रखडलेल्या नळ पाणी योजनेची चौकशी करून योग्य तो न्याय द्यावा.
अन्यथा ग्रामपंचायत निवडणुकीवर पूर्ण बहिष्कार घालणार असल्याचा इशारा तुळसुली गौतमवाडीतील ५० ग्रामस्थांनी जिल्हाधिकाºयांना दिला आहे. या निवेदनावर योगेश्वर जाधव, निलेश जाधव, शाम जाधव, संतोष जाधव, शंकर जाधव यांची नावे आहेत.