सावंतवाडी : सावंतवाडी अर्बन बँकेच्या विलिनीकरणाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ठाणे येथील टीजेएस् सहकारी बँकेत विलिनीकरण होणार असून यासंदर्भात आता सावंतवाडी अर्बन बँकेची सर्वसाधारण सभा २९ जूनला होणार आहे. या सभेत बँकेच्या विलिनीकरणाचा निर्णय घेऊन प्रस्ताव मंजुरीसाठी रिझर्व्ह बँकेकडे पाठविण्यात येणार आहे.यासंदर्भात टीजेएस बँकेची सर्वसाधारण सभा २१ जूनला पार पडली त्यात सावंतवाडी अर्बन बँक विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात आला तर २९ जूनला सावंतवाडी अर्बन बँकेच्या सर्वसाधारण सभेत टीजेएस बँकेत सावंतवाडी अर्बन बँक विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात येणार आहे. सावंतवाडी अर्बन बँक सिंधुदुर्गातील सर्वात जुनी सहकारी संस्था आहे. या संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण जिल्हा आहे. या संस्थेचे जिल्हाभरात बारा हजारांहून अधिक सभासद आहेत. बँकेवर आरबीआयने आठ महिन्यांपूर्वी निर्बंध लादले. बँकेच्या व्यवहारावर निर्बंध आल्यानंतर बँक अडचणीत आली. या परिस्थितीवर मात करण्यासाठी संस्थेच्या संचालक मंडळाने सभासदांकडून तीन कोटीचे भाग भांडवल जमा करण्याचा निर्धार केला. त्यानुसार दीड कोटीहून अधिक भाग भांडवल जमा झाले. अद्याप बँकेवरील निर्बंध हटलेले नाहीत. परंतु अर्बन बँक विलीनीकरणाच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. यापूर्वी अर्बन बँकांना सहकारी बँकेत विलिनीकरणाचा प्रस्ताव होता परंतु यावर शिक्कामोर्तब झाले नाही.दरम्यानच्या काळात 'सावंतवाडी अर्बन बँक अन्य बँकेत विलीनीकरण करण्याबाबत चर्चा होत्या. या चर्चा होत असताना आता सावंतवाडी अर्बन बँक ठाणे येथील टीजेएस सहकारी बँकेत विलिनीकरण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, टीजेएस सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा पडली आहे. तर २९ जूनच्या सावंतवाडी अर्बन बँकेच्या सभेत टीजेएस बँकेत सावंतवाडी अर्बन बँक विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात येणार आहे. या सभेत सभासद काय भूमिका घेतात हे महत्वाचे ठरणार आहे. ही सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.
सावंतवाडी अर्बन विलिनीकरणचा निर्णय येत्या शनिवारच्या सभेत, सभासदांच्या भूमिकेकडे लक्ष
By अनंत खं.जाधव | Published: June 24, 2024 4:27 PM