सिंधुुदुर्गनगरी : आगामी काळात होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये स्थानिकांना ७० टक्के आरक्षण मिळावे, शिक्षक भरतीत गुण वाढवून देणाऱ्या रॅकेटवर कारवाई करावी या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा डी.एड.,बी.एड. धारक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवसाचे साखळी उपोषण सुरु केले आहे.सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा डी.एड., बी.एड. धारक संघटनेचे अध्यक्ष भिवसेन मसुरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील डीएड, बीएडधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु केले आहे.
यावेळी संघटनेच्या उपाध्यक्षा भाग्यश्री रेवडेकर, लवू खरवत, भाग्यश्री नर, गणपत दांडी यांच्यासह शेकडो डीएड, बीएड धारक उपस्थित होते. सिंधुदुर्ग-रत्नागिरी हे कोकणातील अत्यंत दुर्गम भागातील जिल्हे आहेत. येथील तरुण तरुणींनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, जमिनी विकून आपले डीएड, बीएड शिक्षण पूर्ण केले आहे. परंतु, या सर्वांना आज अन्य रोजगारावर आपले पोट भरावे लागत आहे.
शासनाने गेली आठ वर्षे शिक्षक भरती प्रक्रिया राबविली नसल्याने राज्यातील लाखो डी.एड, बीएड धारक बेरोजगार आहेत. केवळ नावालाच शिक्षक पात्रता परीक्षा (टिईटी) राबविली जात असल्याचा आरोपही या संघटनेने केला आहे.
पुढे कोणत्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळेच नाराज झालेल्या जिल्ह्यातील शेकडो उमेदवारांनी आक्रमक भूमिका घेत एप्रिल महिन्यात भव्य मोर्चा काढला होता. तरीही शासनाने याकडे लक्ष दिलेले नाही. म्हणूनच आंदोलनाची पुढील दिशा म्हणून या डीएड, बीएड धारकांनी सोमवार १४ ते १६ मे या तीन दिवसांच्या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यास सुरुवात केली आहे.त्याचप्रमाणे शिक्षक भरतीत स्थानिकांना ७० टक्के आरक्षण न दिल्यास परजिल्ह्यातील एकाही उमेदवारला जिल्ह्यात रूजू करून घेतले जाणार नसल्याचा इशारा या संघटनेने दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या डीएड, बीएड धारकांनी यावेळी विविध गीते व भजने सादर केली. या गीत गायनामधूनही शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
...या आहेत प्रमुख मागण्याआंतरजिल्हा बदल्यांमुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी व येथील बेरोजगारी कमी करण्यासाठी स्थानिक डीएड बीएड धारकांना शिक्षक भरतीत प्राधान्य द्यावे, सिंधुदुर्ग व रत्नागिरी हे जिल्हे डोंगराळ भागात असल्याने या जिल्ह्यात डोंगरी भाग निकषातून आरक्षण मिळावे, सन २०१० सारखे विदर्भ-मराठवाड्यामधील शिक्षकांचे पुनर्वसन कोकणात करू नये, शिक्षक भरतीत गुण वाढवून देणाऱ्या रॅकेटवर कारवाई करावी