कणकवली : केंद्रीय लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावर घेत असतो. यापूर्वीच आम्ही दोघांनीही विकासाच्या मुद्द्यावर एकत्र काम करणार असे जाहीर केलेले आहे. डीएड बेरोजगार त्यांना भेटायला आले होते, त्यामुळे त्यांनी मला भेटायला बोलावले. रत्नागिरीत तासिका तत्वावर डीएड बेरोजगारांची भरती केली. तशी भरती प्रस्ताव तयार करुन अर्थ खात्याकडे पाठवून दिला जाईल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटुन बेरोजगारांच्या कामयस्वरुपी नोकरीबाबत विचार केला जाईल, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत सोमवारी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, कणकवली तालुकाप्रमुख भुषण परुळेकर, उपतालुकाप्रमुख दामोदर सावंत आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री केसरकर म्हणाले, डीएड बेरोजगार सर्वांना नोकरी देण शक्य नाही. राज्यात २ लाख ४० हजार बेरोजगार आहेत. केवळ ३० हजार लोकांनाच नोकरी मिळू शकते. बाकींना नोकरी देणे कठीण आहे. यासाठी त्यांच्या गावातच थोड्या फार कमी खर्चात त्यांना मानधन तत्वावर नोकरी देण्याचा प्रयत्न आहे. रत्नागिरीत ९ हजार रुपये मानधन तत्वावर डीएड बेरोजगारांची भरती केली आहे. त्याच धरतीवर सिंधुदुर्गात भरती करता येईल का? याबाबत निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.नारायण राणेंचे चांगले मार्गदर्शन केंद्रीय मंत्री नारायण राणे हे चांगले मार्गदर्शन करत असतात. जिल्ह्यामध्ये नवीन काय करायचे? हे आम्ही ठरवणार आहोत. राजकीय चर्चेपेक्षा मी राणेंना भेटत असतो. जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही दोघे एकत्र काम करणार हे आम्ही पुर्वी एकदा जाहीर केले होते. गणेशोत्सवात आम्ही भेटलो होतो. त्यामुळे तुम्ही ही राजकीय भेट समजण्याची गरज नाही. गैरसमज नको, माझ्या मनात मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल यापुर्वी जेवढा आदर होता तोच आदर कायम असल्याचेही केसरकरांनी सांगितले. वैयक्तिक संघर्ष नव्हता - नारायण राणेपक्ष वेगवेगळे असल्याने वैचारिक मतभेद होते. आमच्यात आता मतभेद कोणतेही नाहीत. हा डीएड विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. त्यांना नोकरी मिळावी म्हणून मी मंत्री दीपक केसरकर यांना बोलावले होते. ज्या पध्द्तीने रत्नागिरीत डिएड बेरोजगारांना नोकरीत घेण्याचा निर्णय झाला, तो निर्णय सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्हावा यावर चर्चा झाली. केसरकर आणि राणेंमधील राजकीय संघर्ष हा केवळ एखाद्या मुद्द्यावर, विषयावरुन असेल. वैयक्तिक केव्हाही केला नाही असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.
डीएड बेरोजगारांना नोकरीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करणार - शिक्षणमंत्री दीपक केसरकर
By सुधीर राणे | Published: November 27, 2023 4:08 PM