आंबोली : जे रस्ते यावर्षी करण्यात आले आहेत आणि ते वाहून गेले त्यांची यादी मला द्या. तसेच निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ््या यादीत टाका, अशी सक्त ताकीद पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बांधकाम अधिकाऱ्यांना दिली. यावेळी आंबोली ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांसमोर बांधकामच्या अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली. १४ दिवस होऊनही अधिकारी काय करीत होते, असा सवालही ग्रामस्थांनी केला आहे.पालकमंत्र्यांनी आंबोली घाटातील खचलेल्या रस्त्याची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, पोलीस निरीक्षक सुनील धनावडे, बांधकाम विभागाचे अभियंता युवराज देसाई, उपविभागीय अभियता अनंत निकम, जिल्हा परिषद सदस्या रोहिणी गावडे, आंबोली सरपंच लीना गावडे, विलास गावडे, आगारप्रमुख शेख यांच्यासह चौकुळ येथील ग्रामस्थ तुकाराम गावडे, रुपेश गावडे, गुलाबराव गावडे, सरपंच रिता गावडे आदी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्र्यांसमोर ग्रामस्थांनी बांधकामच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. आंबोली घाटात रस्ता खचून १४ दिवस लोटले तरी कोणतीच कारवाई बांधकाम विभागाने केली नसल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप होता. हा संताप ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांसमोर व्यक्त करून दाखविला व बांधकामच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
बांधकाम विभागाने केवळ वेळकाढूपणा केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तर ग्रामस्थ बांधकाम बंद करीत असल्याचा आरोप बांधकामच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवित हा आरोप खोडून काढला. यावेळी पालकमंत्र्यांनी सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात ज्या-ज्या ठिकाणी नवीन रस्ते झाले होते व जे रस्ते वाहून गेले, अशा निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांची चौकशी करून त्यांना काळ््या यादीत टाकण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.बांधकाम विभागाला ताकीद देऊन दोन दिवसांत आंबोली घाटातील रस्ता सुरळीत करून एसटी बस सुरू होईल याची व्यवस्था करा, असे पालकमंत्र्यांनी खडसावून सांगितले. त्यामुळे बुधवारपर्यंत एसटी सुरू होईल व त्यानंतर अवजड वाहनेही सुरू होतील, असे सांगण्यात आले.