सावंतवाडी : मळेवाड पंचक्रोशीतील चोरी प्रकरणातील आरोपी विनायक काळोजी याला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर दुसरा आरोपी दीपक धानजी हा पसार झाला होता. त्याला पोलिसांनी नाट्यमयरित्या वेंगुर्ले येथून ताब्यात घेतले आहे. उशिरा त्याला वेंगुर्ले पोलिसांनी सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस धानजीला मंगळवारी येथील न्यायालयात हजर करणार आहे. मळेवाड पंचक्रोशीमध्ये मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडल्या असून, ग्रामस्थांच्या मदतीने पकडलेल्या विनायक काळोजीच्या आजगाव येथील घरातून पोलिसांनी तब्बल ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला होता. तर दुसरा आरोपी दीपक धानजी हा गेले दोन दिवस फरार होता. पोलीस त्याचा सर्वत्र शोध घेत होते. दीपक याच्या शिरोड्यातील घरीही पोलीस जाऊन आले होते. मात्र, घरच्यांनाही तो कुठे आहे, याची माहिती नव्हती. त्यातच दीपक धानजी हा गुन्हेगार प्रवृत्तीचा असल्याने तो पुन्हा मुंबई किंवा गोवा येथे गेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. तरीही पोलीस त्याच्या मागावर होते. दरम्यान, सोमवारी दुपारी धानजी हा वेंगुर्ले मच्छीमार्केट परिसरात काहींना दिसला. त्यांनी तातडीने वेंगुर्ले पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी मच्छीमार्केट परिसरातून धानजी याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर याची कल्पना सावंतवाडी पोलिसांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांनी वेंगुर्ले येथे एक पथक पाठवून धानजी याला ताब्यात घेतले आहे. धानजीला पोलीस रात्री उशिरापर्यंत सावंतवाडीत आणणार असून, त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करून रितसर अटक करण्यात येणार आहे. तर मंगळवारी येथील न्यायालयात हजर करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. धानजी याच्या अटकेमुळे आणखी काही गुन्हे उघडकीस येतील, अशी आशा पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
दीपक धानजीला वेंगुर्लेत केली अटक
By admin | Published: January 25, 2016 11:30 PM