कणकवली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे व अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने शासनाला जाग आणण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी शासनाच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे.
सकल मराठा समाजाने ९ आॅगस्टला राज्यभर जेलभरो आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक तालुकावार जेलभरो आंदोलन केले जाणार आहे. त्याप्रमाणे कणकवली तालुक्यातही सकल मराठा समाजाच्यावतीने जेलभरो आंदोलन छेडण्यात येणार आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर राज्यात गृहमंत्री म्हणून फिरत आहेत. मात्र सिंधुदुर्गातील मराठा समाजाकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास केसरकरांना समाज मतदान करणार नाही, असा इशारा सकल मराठा समाज संयोजकांनी दिला आहे.कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कणकवली तालुका सकल मराठा समाजाचे एस. टी. सावंत, लवू वारंग, सोनू सावंत, सुशांत नाईक, राजू रावराणे, समर्थ राणे, महेंद्र सांब्रेकर, बच्चू प्रभुगांवकर, भाई परब, सदाशिव राणे, सुशिल सावंत, दिलीप तळेकर, अनुप वारंग, अॅड. हर्षद गावडे, सादिक कुडाळकर, महेंद्र गावकर आदी समाजबांधव उपस्थित होते.सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे या आणि अन्य मागण्यांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाबंद आणि रास्तारोको आंदोलन सुरू आहेत. शासनाला जाग आणण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जी क्रांती निर्माण झाली आहे ती क्रांती आणखी उभी राहण्यासाठी ९ आॅगस्ट रोजी क्रांती दिनादिवशी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.शासनास सर्व मागण्या मान्य करण्यास भाग पाडण्यासाठी जेलभरो आंदोलन छेडणार आहोत. या जेलभरो आंदोलनात कणकवली तालुका सकल मराठा समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. या आंदोलनात मराठा समाजातील युवक-युवती महिला, तसेच विद्यार्थी आणि मराठा सामाजिक, शासकीय-निमशासकीय संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहनही करण्यात आले.२ आॅगस्ट रोजी नियोजनाची बैठक पार पडली. या बैठकीत ९ आॅगस्टच्या आंदोलनाबाबत विचार विनिमय करण्यात आला. हे जेलभरो आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्व मराठा बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले. २ वर्षांपूर्वी मराठा क्रांती मोर्चाने मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन केले होते. त्याचप्रमाणे या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.रास्तारोको आंदोलनात मराठा समाज बांधवांवर पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. ते गुन्हे शासनाने मागे घ्यावेत अशी मागणी सकल मराठा समाजाने केली आहे. त्या मराठा बांधवांच्या पाठीशी मराठा समाज उभा आहे. शासनाने जर मराठा समाजाची आरक्षणाची मागणी मान्य केली नाही तर यापुढे मराठा समाज शासनाला असहकार करेल असा इशारा मराठा समाज संयोजकांनी दिला आहे. इतर समाज बांधवांनी या मराठा आरक्षणाला पाठिंबा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.