सावंतवाडी : बबन साळगावकर यांना कोणीतरी माझ्या बदनामीसाठी वापरून घेत आहे. हे त्यांनी वेळीच ओळखले पाहिजे. ते माझे कायम मित्रच राहतील, असे सांगत सावंतवाडी शहरातील विकासकामे आपल्या वादामुळे मागे राहता नये, असे आवाहनही यावेळी सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. ते सावंतवाडी येथे बोलत होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे उपस्थित होते.मंत्री केसरकर म्हणाले, सावंतवाडीचा विकास हा आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. इतर शहरे पुढे जात असताना सावंतवाडी मागे राहू नये ही माझी अपेक्षा आहे. सावंतवाडी शहरासाठी वेगवेगळी विकासकामे मंजूर करून घेतली असून, ती पूर्ण झाली पाहिजेत. सावंतवाडीत विद्युत भूमिगत विद्युतवाहिनी गेली पाहिजे. त्यासाठी निधी मंजूर आहे. जर विद्युत विभागाला काम करण्यास दिले नाही तर ते पैसे मागे जातील याला जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.साळगावकर हे माझे कालही मित्र होते, आजही मित्र आहेत. त्यांनी टीका केली म्हणून शत्रुत्व येणार नाही. प्रत्येकाची काही तरी महत्त्वाकांक्षा असते, ती पूर्ण झालीच पाहिजे. पण एखादा वाद शहराच्या विकासाच्या व हिताच्या आड येऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
साळगावकर यांना माझी बदनामी करण्यासाठी वापरून घेतले जात आहे. त्यामुळे जनतेने यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले. सावंतवाडीतील मोनोरेल प्रकल्पांचे भूमिपूजन लवकरच करण्यात येणार आहे. इतर प्रकल्पांची भूमिपूजनेही होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.