सावंतवाडी : बांदा दोडामार्ग रस्त्याची निविदा मंजूर झाली असून, सद्य:स्थितीत खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. श्रेय लाटण्यासाठी त्यावरून आंदोलन करून जनतेची दिशाभूल करणे हे चुकीचे आहे. आमदार नितेश राणे हे सावंतवाडी मतदारसंघात येऊन ढवळाढवळ करतात. त्यांनी ते वेळीच थांबवावे. तसेच त्यांनी आपल्या मतदारसंघातील रस्त्याची अवस्था बघावी आणि नंतर येथे येऊन बैठक घ्यावी, असा सल्ला माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी दिला.
ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी केसरकर यांनी कणकवली मतदारसंघात काही रस्त्यांवर पडलेले खड्डे छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवले. केसरकर म्हणाले, बांदा दोडामार्ग रस्त्याची निविदा मंजूर आहे. २२ नोव्हेंबरला ती ओपन करण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत खड्डे भरण्याचे काम सुरू आहे.
काम सुरू झाल्यानंतर त्यासाठी आंदोलन करणे चुकीचे आहे. निधी आम्ही आणायचा आणि श्रेय दुसऱ्याने घ्यायचे, असाच प्रकार सुरू आहे. जिल्ह्यातील तीनही मतदारसंघांतील रस्त्यांची परिस्थिती वाईट आहे. मात्र केवळ सावंतवाडी मतदारसंघातील रस्ते खराब आहेत, असे भासविले जात आहे. त्यामुळे दुसऱ्यांच्या मतदारसंघातील उणी काढण्यापेक्षा स्वतःच्या मतदारसंघातील रस्त्यांच्या वाईट परिस्थितीकडे त्यांनी लक्ष द्यावे.यावेळी कणकवली मतदारसंघातील रस्त्यांची परिस्थिती ही अत्यंत वाईट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राणे माझ्या मतदारसंघात आले म्हणून काहीच फरक पडणार नाही. माझ्या निवडणुकीत गोव्याचे अर्धे मंत्रिमंडळ विरोधात उतरले होते. परंतु त्याचा काहीही परिणाम झाला नाही. मात्र जनतेला वस्तुस्थिती समजणे गरजेचे असून, या ठिकाणी येऊन दिशाभूल करणे राणे यांनी थांबवावे, असे केसरकर यांनी यावेळी सांगितले.
मंजूर रस्त्यांची कामे सुरू न केल्यास कारवाई
दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाचे कामही रखडले आहेत. याबाबत आपण जातीने लक्ष घातले असून, अधिकाऱ्यांवर अवलंबून राहून याकडे दिरंगाई होते हे लक्षात आले. उद्या दोडामार्ग रुग्णालयाचे टेंडर निघाल्यावर कोणीही उपोषणाला बसेल तर ते चुकीचे आहे. हॉस्पिटलबरोबरच पारगड रस्ता मांगेली ते सडा रस्ता, कुंभवडे, तेरवण आधी चार महत्त्वाचे दोडामार्ग तालुक्यातील रस्ते आपण मंजूर करून आणले आहेत. मंजूर रस्त्यांची कामे तत्काळ सुरू न केल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई करताना त्याचा ठेका रद्द करण्यात येणार आहे, असेही केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले.