सुधीर राणेकणकवली : शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर हे नको ती आणि चुकीची विधाने करत आहेत. त्यामुळे त्यांना वेळीच आवर घालावा अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही देणार आहोत. भाजप नेत्यांवर केसरकरांनी बोलू नये. त्यांना तो नैतिक अधिकार नाही असे प्रत्युत्तर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केसरकरांना दिले. कणकवली येथे भाजपच्या जिल्हा कार्यालयात आज, शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बबलू सावंत उपस्थित होते.तेली म्हणाले, दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात जनतेने त्यांचे साधे स्वागत सुद्धा केले नाही. याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे. शिंदे गटातील ३९ आमदारांचे त्यांच्या जिल्हात भव्य स्वागत आणि जाहीर मेळावे झाले. पण केसरकर हे एकमेव व्यक्ती आहेत की त्यांचे मतदारसंघात स्वागतही झाले नाही. राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर हजारो कोटींची कामे शिंदे गटाच्या अनेक आमदारांनी आपल्या मतदार संघात नेली. केसरकर यांना त्यापैकी एकही रुपयाचा निधी जिल्ह्यात किंवा मतदार संघात आणता आला नाही. असे असताना स्वतःचे अपयश लपवण्यासाठी नको ती वक्तव्य करून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केसरकर यांनी करू नये.केसरकर ज्या पद्धतीने काही विषयांवर गरज नसताना ते बोलत आहेत, तो प्रकार आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या तोंडावर चुकीचा आहे. त्यामुळे केसरकर यांना आवर घातला पाहिजे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्यावतीने निवेदन देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले....त्यासाठी प्रयत्न करावाराज्यात सत्ता बदल व्हावा अशी जनतेची अपेक्षा होती. तो झाला आणि शिंदे -फडणवीस सरकारने पेट्रोल वरील कर कमी केला. शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान दिले. नवनवीन योजना सुरू केल्या. त्यामुळे राज्यात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. अशावेळी आमदार केसरकर हे नको त्या विषयाला हात घालून चांगले विषय जनतेपासून दूर नेण्याचा प्रयत्न करत आहेत. आमदार आदित्य ठाकरे यांनी सुद्धा केसरकर यांना सुनावलेले आहे. त्यामुळे वेगळे वक्तव्य करण्यापेक्षा दुरावलेल्या लोकांना जवळ करण्याचा प्रयत्न त्यांनी करावा.'ते' केसरकरांनी ठरवावेकेसरकर यांना शिवसेनेचा बराचसा इतिहास माहित नाही. १९९९ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी सावंतवाडीतून मला उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, उद्धव ठाकरेंच्या आगे पीछे असणाऱ्या लोकांनी शिवराम दळवी यांना आयत्यावेळी उमेदवारी द्यायला भाग पाडली. त्याला दत्ता दळवी, आताचे खासदार विनायक राऊत यांनी खतपाणी घातले.हा इतिहास शिवसेनेचा आहे. तो पडताळून घ्यावा आणि मग राजकारण करत बसावे. सरकार आले त्या संधीचा फायदा मतदार संघातील जनतेला करून द्यायचा की अशीच वक्तव्य करत बसायचे हे केसरकर यांनी ठरवावे असे ही तेली यावेळी म्हणाले.
'दीपक केसरकरांना आवर घाला, भाजपच्या नेत्यांवर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2022 4:06 PM