सावंतवाडी : शिवसेनेत फूट पडल्यानंतर जे आमदार गुवाहाटीला गेले त्यात सध्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा समावेश होता. त्यांनी त्यावेळी युवा सेनेकडून आपणास अडवले म्हणून सांगितले, पण त्यांना आम्ही अडवले नव्हते. त्यांनी माझे नाव चुकीच्या पद्धतीने घेतले. युवा सेनेकडून त्यांना अडविण्यात आले असेल तर त्यात गैर काय ? त्याचा मला अभिमानच वाटतो, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते वरूण सरदेसाई यांनी मंत्री केसरकर यांची खिल्ली उडवली. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारचे शैक्षणिक धोरण चांगले असले तरी अंमलबजावणी योग्य व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.सावंतवाडीत युवा सेनेच्या माध्यमातून फलकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, अतुल रावराणे, चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, ऋची राऊत, सुशांत नाईक, सागर नाणोसकर, आबा सावंत, कौस्तुभ गावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रात युवा सेनेच्या माध्यमातून जिथे जिथे जातो, तेथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. सर्वजण संघटनेच्या मागे उभे राहण्याची भावना व्यक्त करत आहेत. तिच भावना सिंधुदुर्ग जिल्ह्यातदेखील बघायला मिळत आहे. हा विश्वास कायम ठेवा, पक्षाची वाटचाल सर्वांना सोबत घेऊन करूया, असे आवाहन सरदेसाई यांनी केले.कॉलेज कक्ष स्थापन करणारगणेश चतुर्थीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणखी २५ महाविद्यालयांमध्ये कॉलेज कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. युवा आणि युवती सेना स्थापन करून महाविद्यालयीन समस्यांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या समस्या सोडविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.उद्धव ठाकरे यांनी अभ्यास समिती नेमलीयावेळी नवीन शैक्षणिक धोरणाबाबत त्यांना विचारण्यात आले असता सरदेसाई म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात येणार असताना तत्कालीन मुख्यमंत्री, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अभ्यास समिती नेमली. त्यामध्ये चांगल्या गोष्टी आहेत. मागील पन्नास-साठ वर्षांमध्ये शैक्षणिक धोरण अवलंबण्यात आले नव्हते. मात्र, शैक्षणिक धोरण चांगले असले तरी त्याची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. समानता आणण्यासाठी शैक्षणिक धोरणाचा फायदा होईल आणि ती अंमलबजावणी करताना पालकांना विश्वासात घेऊन केली पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.