Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapses: सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी अचानक कोसळला. नौदल निमित्ताने वर्षभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ फुटी पुतळ्याचे अनावरण केलं होतं. मात्र वर्ष पूर्ण होण्याआधीच हा पुतळा कोसलळ्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शिवप्रेमींसह विरोधकांनी यावरुन सरकारला धारेवर धरलं आहे. मात्र आता मंत्री दीपक केसरकर यांनी या घटनेबाबत केलेल्या विधानाची चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे. चांगलं घडायचं होतं म्हणून वाईट घडलं असं मला वाटतं असं मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानावरुन आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नौदल दिनानिमित्त ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या २८ फुटी पुतळ्याचे लोकार्पण केले होते. मात्र आता हा पुतळा सोमवारी कोसळला. हा पुतळा कोसळ्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शालेय शिक्षण मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी ही दुर्घटना घडली त्या ठिकाणी मंगळवारी भेट दिली. यावेळी केसरकर यांनी त्याचठिकाणी १०० फूट उंचीच्या पुतळ्याची उभारणी करावी अशी मागणी केली आहे.
"पुतळा कोसळणे हे दुर्दैवी आहेच. या पुतळ्याची उंची २८ फूट होती. मात्र येथील लोकांनी १०० फुटांचा पुतळा असावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. जर १०० फुटांचा पुतळा याठिकाणी उभा केल्यास ती सर्वांसाठीच अभिमानाची बाब असेल. मी राजकोट किल्ल्याचा दौरा करून पाहणी करणार आहे,” असं मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं.
शिवप्रेमींकडून याबाबत संताप व्यक्त करण्यात येत असल्याचा प्रश्न दीपक केसरकर यांना विचारण्यात आला होत. त्यावर बोलताना दीपक केसरकर यांनी हे विधान केलं. "सध्या मला वाटतं हा एक अपघात आहे. त्यामुळे लोकांनी त्याचप्रकारे ते घ्याव. असं असेल की वाईटातून चांगलं घडायचं असेल. त्यामुळे हा अपघात घडला असेल. काही सांगता येत नाही. अपघात कसा घडला याची चौकशी शासन करेल आणि त्याप्रमाणे कारवाई करेल. पण कारवाई केल्यामळे भावना भरुन येत नाही, असं दीपक केसरकर म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले पुतळा कोसळण्याचे कारण
"पुतळ्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं आणि य कार्यक्रमाला आम्हीसुद्धा उपस्थित होतो. छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे. हा पुतळा नौदलाने उभारला होता. त्याची संपूर्ण रचना नौदलाने तयार केली होती. मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितले की, ४५ किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहत होता. त्यामध्ये पुतळ्याचे नुकसान झालं. उद्याच तिथे नौदलाचे अधिकारी येणार आहेत. पुन्हा तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा दिमाखात उभा करण्याचे काम आम्ही करु," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.