कणकवली : दीपक सोनावणे यांच्याकडील कणकवली वनक्षेत्रपालपदाचा कार्यभार तडकाफडकी काढून घेण्यात आला आहे. तर रत्नागिरी फिरते पथकाचे वनक्षेत्रपाल रमेश कांबळे यांच्याकडे कणकवली वनक्षेत्रपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे .कोल्हापूर मुख्य वनसंरक्षक डॉ . व्ही.क्लेमंट बेन यांनी ३ मार्च रोजी दीपक सोनवणे यांच्याऐवजी रमेश कांबळे यांच्याकडे कणकवली वनक्षेत्रपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्याचे आदेश काढले होते . त्यानुसार सावंतवाडी उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांनी ४ मार्च रोजी सोनवणे यांच्याकडील कणकवली वनक्षेत्रपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार रमेश कांबळे यांच्याकडे देण्याचे लेखी आदेश काढले .
वरिष्ठांच्या आदेशानंतरही सोनवणे यांनी कणकवली वनक्षेत्रपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार न सोडल्यामुळे रमेश कांबळे यांनी कणकवली वनक्षेत्रपाल पदाचा एकतर्फी संपूर्ण कार्यभार वरिष्ठांच्या आदेशानुसार शुक्रवारी स्वीकारला आहे . दरम्यान दीपक सोनवणे यांच्याकडील कणकवली वनक्षेत्रपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार तडकाफडकी काढून घेण्यामागे फोंडाघाट कातकरी मारहाण प्रकरण जबाबदारीने न हाताळल्याची पार्श्वभूमी आहे .१८ फेब्रुवारी रोजी फोंडाघाट-गांगोवाडी माळ येथे राहणार्या कातकरी आदिवासी कुटुंबांपैकी सखू पवार हिच्यासह अन्य पाच जण फोंडाघाट जंगलात औषधी मुळे, झाडपाला गोळा करण्यासाठी गेले होते. यावेळी वनपाल आणि कर्मचार्यांनी त्यांना मारहाण केल्याची तक्रार कणकवली पोलिस ठाण्यात देण्यात आली होती.
त्यानुसार याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन अटकेची कारवाई झालेले फोंडाघाट वनक्षेत्राचे वनपाल शशिकांत दत्ताराम साटम, वनरक्षक संदीपकुमार सदाशिव कुंभार, सुभाष दिलीप बडदे, मच्छिंद्र श्रीकृष्ण दराडे आणि वनमजूर सत्यवान सहदेव कुबल यांच्यावर अखेर सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांनी निलंबनाची कारवाई केली होती.