नांदगांव : साळिस्ते येथील दीपाली शेलार हिला कासार्डे येथील आमदार प्रमोद जठार मित्रमंडळाच्यावतीने पुढील शैक्षणिक खर्चासाठी तातडीची आर्थिक मदत नुकतीच देण्यात आली. ‘लोकमत’ने दीपालीच्या प्रतिकूल परिस्थितीत घेतलेल्या शिक्षणाबाबत व मिळविलेल्या उज्ज्वल यशाबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल या मंडळाकडून घेण्यात आली.साळिस्तेसारख्या ग्रामीण भागात राहून व वारगांवसारख्या ग्रामीण भागात शिक्षण घेऊन घरची परिस्थिती नसतानाही एस. एस. सी. परीक्षेत उज्ज्वल यश मिळविले. तिला परिचारिका बनण्याचे स्वप्न असून घरची परिस्थिती अत्यंत बेताचीच आहे. या पार्श्वभूमीवर कासार्डे येथील आमदार प्रमोद जठार मित्रमंडळाच्यावतीने तातडीने रोख रक्कम देऊन मदत दीपालीचे आईवडीलांकडे सुपूर्द केली. घरची परिस्थिती नसल्यामुळे दहावीनंतरचे शिक्षण घेणे शक्य होत नाही. यासाठी तातडीची मदत करून बारावीपर्यंत व त्यापुढे येणाऱ्या शिक्षणासाठी आमदार प्रमोद जठार यांच्या माध्यमातून आवश्यक ती मदत करण्यात येईल, असे आश्वासन संजय नकाशे यांनी दिले. या मदतीनंतर दीपिकाच्या आईवडीलांनी आभार मानले व या परिस्थितीत केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानतानाच याहीपुढे खूप मेहनत घेऊन चांगले यश मिळविले असे दीपिकाने सांगितले. यावेळी संजय नकाशे, भाई आडिवरेकर, हनुमंत शेलार, आई अंजली शेलार व वडील अनंत शेलार उपस्थित होते. ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल‘लोकमत’ने प्रतिकूल परिस्थितीत एस. एस. सी. परीक्षेत उज्ज्वल यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्याबद्दल वृत्त प्रसिद्ध केले. त्या वृत्ताची दखल घेऊन कासार्डे येथील आमदार प्रमोद जठार मित्रमंडळाने तातडीची मदत केली. तसेच पुढील शिक्षणासाठी येणाऱ्या खर्चासाठी आमदार प्रमोद जठार यांच्या माध्यमातून मदत करण्यात येईल, असे सांगण्यात आले. (वार्ताहर)
दीपालीला मिळाली शैक्षणिक मदत
By admin | Published: July 08, 2014 12:25 AM