कणकवली : मनमोहक पणत्या, तोरणे, आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांच्या माळा आणि नयनरम्य अशी आरास कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी दिसून येत आहे. दीपोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून त्यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सर्वत्र पहायला मिळत आहे.सर्वात मोठा सण असलेल्या दीपोत्सव पर्वास सुरुवात झाली असून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा रंगीबेरंगी प्रकाशात उजळून निघाला आहे. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज असे दीपावलीतील एकेक सण दररोज साजरे करण्यासाठी घरोघरी तयारीही पूर्ण झाली आहे. तर अनेक ठिकाणी बच्चे कंपनी किल्ला बनविण्यात गर्क झाली असल्याचे दिसून येत आहे.दिवाळी हा सर्वात मोठा सण आहे. पाच दिवस चालणाऱ्या उत्सवाचे वेध महिनाभर अगोदरपासूनच लागलेले असतात. फराळ, कपडे, धार्मिक विधी अशा अनेक कामांची घाई झालेली असते. त्यासाठी विविध प्रकारची खरेदी केली जाते. मात्र, वाढत्या महागाईमुळे ग्राहकांना खरेदी करताना हात आखडता घ्यावा लागत आहे. सर्व बाजारपेठा दिवाळीसाठी लागणाऱ्या साहित्याने सजल्या आहेत. गृहोपयोगी वस्तू, कपडे, फळे, फुले अशी विविध प्रकारची खरेदी सहकुटुंब केली जात असल्याचे सध्या दिसत आहे.नरक चतुर्दशी मंगळवारी साजरी करण्यात आली. सूर्योदयापूर्वी अनेक ठिकाणी नरकासुराच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच एकमेकांना फराळाचे निमंत्रण देऊन करंज्या, लाडू, चकली, चिवडा अशा फराळाचा आस्वाद घेण्यात आला. सुमधुर गीतांचा दिवाळी पहाट कार्यक्रमही अनेक ठिकाणी या दिवशी झाला.बुधवारी लक्ष्मीपूजन आहे. त्यासाठी मंगळवारीच तयारी करण्यात येत होती. तसेच दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेसाठी खरेदी करण्यात येत होती. यावर्षी दिवाळी तब्बल पाच दिवसांची असल्याने उत्सवाचा गोडवा वाढणार आहे. त्यानिमित्त घरोघरी दीप उजळले आहेत. विद्युत माळांमुळे रोषणाईत भर पडली आहे. वर्षभरातील थकवा दूर सारून आता सारेजणच दिवाळीचा आनंद लुटण्यासाठी सज्ज झाले आहेत. ग्रामीण भागात काही ठिकाणी भात कापणीची लगबग सुरू आहे.
सिंधुदुर्गात दीपोत्सव, आकर्षक रोषणाई : सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2018 12:51 PM
मनमोहक पणत्या, तोरणे, आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांच्या माळा आणि नयनरम्य अशी आरास कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी दिसून येत आहे. दीपोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून त्यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सर्वत्र पहायला मिळत आहे.
ठळक मुद्देसिंधुदुर्गात दीपोत्सव, आकर्षक रोषणाई सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल