वैभववाडी : वैभववाडी शहरात टपऱ्यांची संख्या वाढत चालली आहे, या मुद्यावर नगरपंचायत सभेत विरोधकांसह सत्ताधारी नगरसेवकांनी प्रशासनावर हल्ला चढविला. जप्त केलेले स्टॉल्स नगरपंचायतीच्या आवारातून उचलून नेले जातात. तरी प्रशासन कारवाई का करीत नाही? असा सवाल सत्ताधारी नगरसेवकांनी केला. मात्र, जागा कोणाच्या मालकीची आहे हे पहावे लागेल, अशी पळवाट काढून मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी हात झटकले. त्यामुळे नगरपंचायत काळातील सर्व स्टॉल्स तातडीने काढण्याची एकमुखी मागणी सर्व नगरसेवकांनी सभागृहात केली.नगराध्यक्षा दीपा गजोबार यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा झाली. या सभेला उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, बांधकाम सभापती संतोष पवार, शिक्षण सभापती समिता कुडाळकर, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, नगरसेवक रवींद्र रावराणे, सज्जन रावराणे, रवींद्र तांबे, संतोष माईणकर, संजय सावंत, अक्षता जैतापकर, शोभा लसणे, मनिषा मसुरकर, सुप्रिया तांबे आदी उपस्थित होते.सार्वजनिक भूखंडात स्टॉल कोणी लावला? अशी विचारणा नगरसेवक संतोष माईणकर यांनी केली. हा धागा पकडून जप्त करून नगरपंचायत आवारात ठेवलेला स्टॉल बाहेर गेला कसा? आणि तो सार्वजनिक भूखंडात कोणाच्या आशीर्वादाने लागला? नगरपंचायत आवारातील जप्त स्टॉल्स उचलून नेले जात असताना प्रशासन गप्प का? पोलिसांत तक्रार का देत नाही? असा सवाल नगरसेवक रवींद्र तांबे यांनी मुख्याधिकाऱ्यांना केला.त्यावर तो स्टॉल जप्त केलाच नव्हता असे एका कर्मचाऱ्याने सभागृहात सांगितले. त्यावेळी ह्यतुम्ही इथे स्टॉल बनवून विकता काय?ह्ण असा प्रश्न नगरसेवक संजय सावंत यांनी विचारला. त्यावेळी मुख्याधिकारी कंकाळ यांनी त्या कर्मचाऱ्यांला सभागृहातच फटकारले.नगरपंचायतीला स्टॉल्स काढण्याचा अधिकार नाही. स्टॉल्स लागलेल्या जागेची मालकी कोणाची हे पहावे लागेल. त्यामुळे महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून माहिती घेण्याची कर्मचाऱ्यांना सूचना करीत बेकायदेशीर स्टॉल्सच्या कारवाईबाबत कंकाळ यांनी अक्षरश: हात झटकले.
त्यावेळी स्टॉल्समुुळे नगरसेवकांची बदनामी होते. त्यामुळे नगरपंचायत काळात बाजारपेठेत लागलेले सर्व स्टॉल्स काढण्याची सूूचना संंतोष पवार यांनी केली. त्यांच्या मागणीला एकमुखी पाठींबा देत विरोधकांसह सत्ताधारी नगरसेवकांनी पवार यांच्या सूचनेप्रमाणे कारवाई करण्याची मागणी केली.ग्रामपंचायत काळात जमा होणाऱ्या बाजार कराच्या रकमेपेक्षा नगरपंचायत काळात कमी कर जमा होत असल्याचे पत्रक एका नागरिकाने शहरात वाटले. त्याचे स्पष्टीकरण नगरपंचायतीने का दिले नाही? असा प्रश्न सज्जन रावराणे यांनी उपस्थित केला. त्यावेळी ह्यआपल्या कार्यकाळात आठवड्याला १० हजार रुपये बाजारकर जमा होत होता, मग आता कमी कसा होतो?ह्ण अशी विचारणा करीत रवींद्र रावराणे यांनी नगरपंचायत प्रशासनाला घरचा आहेर दिला.त्यावेळी व्यापाऱ्यांची संख्या वाढली आहे. आठवडा बाजाराची व्याप्ती वाढत आहे. मग पैसे कमी का? अशी विचारणा नगरसेवक सावंत व कुडाळकर यांनी केली. त्यावेळी मुख्याधिकारी कंकाळ यांनी ह्यबाजारात बसणाऱ्या व्यापाऱ्यांना जागा मोजून देऊन त्यानुसार कर आकारणी करावी लागेल. त्यादृष्टीने पुढील सभेत माहिती दिली जाईलह्ण, असे सांगितले.सभागृहात शासन परिपत्रकांचे वाचन केले जात नसल्याचा मुद्दा रवींद्र रावराणे यांनी उपस्थित केला. त्याचवेळी नागरिकांच्या तक्रार अर्जांचेही सभागृहात वाचन झाले पाहिजे. परंतु, नागरिकांचे अर्ज कचऱ्याच्या टोपलीत टाकले जात असल्याचा आरोप सज्जन रावराणे यांनी केला. त्यावर कंकाळ यांनी परिपत्रक वाचनाचा विषय पुढील अजेंड्यात नमूद करण्याची सूचना केली.पाणी मिळणार नसेल तर जागा मोकळी करादत्तमंदिराच्या आवारात शुद्ध पाण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. परंतु, नागरिकांना एक बाटलीही पाणी मिळालेले नाही. जनतेला त्यातून शुद्ध पाणी मिळणार नसेल तर उगाच अडचण नको. तेथील यंत्रणा हटवून जागा खुली करा, अशी सूचना नगरसेवक संतोष माईणकर यांनी केली.