पाली : रत्नागिरी तालुक्यातील मौजे पाली हे गाव कोकण व घाट यांना जोडणारा एक महत्वाचा परिसर आहे. पर्यटनदृष्ट्या विकसित होऊ शकणाऱ्या पाली गावाला तालुक्याचा दर्जा मिळावा अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत एक सदस्यीय होकारार्थी नाडकर्णी अहवालही शासनाला सादर करण्यात आला आहे. आंबाघाट उतरुन आल्यावर निसर्गाची खास अदाकारी आंबाघाट, साखरपा, पाली परिसर पाहिल्यावर दृष्टीस पडते. वास्तविक हा भाग पर्यटनक्षेत्र म्हणून यापूर्वीच घोषित व्हायला पाहिजे होता. यासाठीही पाली भागातील सामाजिक कार्यकर्ते कै. विश्वनाथ सावंत यांची पूर्वीपासूनची मागणी होती. परंतु, त्या मागणीकडे दुर्लक्ष करणेत आले असून, गेली कित्येक वर्ष पाली हा एक टूमदार तालुका व्हावा यासाठीही येथील जुने-जाणते दलितमित्र समाजसेवक कै. मुकुंदराव सावंत व त्यांचे पुत्र कै. विश्वनाथ सावंत, सिद्धराज सावंत यांचे अनेक वर्ष शासनदरबारी प्रयत्न सुरु होते व आजही सुरु आहेत. माजी मुख्यमंत्री बॅ. अंतुले असताना रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन सिंधुदुर्ग जिल्हा झाला. त्याचवेळी वैभववाडी हा तालुका झाला. सुमारे ३० ते ३५ गावांचा हा छोटा तालुका त्यावेळी निर्माण झाला. तसेच त्यानंतरही काही तालुक्यांची निर्मिती झाली. पाली तालुका अथक प्रयत्न करुनही अद्याप झालेला नाही. वास्तविक वैभववाडी तालुक्याच्या अंतर्गत येणाऱ्या गावांपेक्षाही जादा गावे पाली तालुक्याच्या निर्मितीमध्ये समाविष्ट केलेली आहेत. पाली तालुक्यात येणारी गावे क्षेत्रफळाने मोठी असतानाही तसेच उत्पन्नाने व महसुलाने मोठी असताना देखील अद्याप पाली हा तालुका झालेला नाही. नव्या सरकारने पाली तालुका निर्माण करावा, अशी मागणी जोर धरत आहे. (वार्ताहर)पाली येथे महसूल खात्याची स्वत:च्या मालकीची जागा असून, सर्कल कार्यालय आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचीही पाली येथे जागा आहे. महावितरणचीही येथे जागा असून, तेथे त्यांचे युनिट, कार्यालय आहे. एस. टी.चेही येथे टूमदार बसस्थानक आहे. पोस्ट कार्यालय, वनखाते, बँका, सोसायट्या, पतसंस्था, पोलीस स्टेशन, बाजारपेठ आदी असून, येथे आठवडा बाजारही भरतो.
स्वतंत्र पाली तालुक्याची मागणी
By admin | Published: September 24, 2015 11:08 PM